Schools and colleges in Pune to remain closed : पुणे शहरात 19 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणारी ‘बजाज पुणे ग्रँड टूर 2026’ ही भारतातील पहिली UCI 2.2 दर्जाची आंतरराष्ट्रीय मल्टी-स्टेज रोड सायकलिंग स्पर्धा पुण्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. या जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, सोमवार, दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी पुणे शहरातील प्रमुख भागांतील सर्व शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
याबाबतचे अधिकृत आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी निर्गमित केले आहेत. या दिवशी पुणे शहरात स्पर्धेतील ‘प्रोलॉग रेस’ होणार असून, या शर्यतीसाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात येणार आहेत. प्रोलॉग रेसच्या निमित्ताने सकाळी 9 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये फर्ग्युसन कॉलेज रोड (एफ.सी. रोड), गणेशखिंड रोड, जंगली महाराज रस्ता (जे.एम. रोड) तसेच या मुख्य मार्गांना जोडणारे उपरस्ते आणि अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे.
या रस्ते बंदीमुळे शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती, पालक तसेच शिक्षक वर्गाला मोठ्या प्रमाणावर गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह वाहतुकीवरील ताण कमी करणे, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.
89 विरुद्ध 29, मुंबईचा महापौराच्या पेचात शिंदेंनी भाजपाला कैचीत पकडलं का?
यानुसार, पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजीनगर–घोले रोड, विश्रामबागवाडा–कसबा, ढोले पाटील रोड, भवानी पेठ, औंध–बाणेर, कोथरूड–बावधन, सिंहगड रोड तसेच वारजे–कर्वेनगर या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्व अंगणवाड्या, शासकीय व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये तसेच व्यावसायिक शिक्षण संस्था सोमवार, 19 जानेवारी रोजी बंद राहणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हा सुट्टीचा आदेश केवळ सोमवार, 19 जानेवारी 2026 या एका दिवसापुरताच लागू राहणार असून, मंगळवार, दिनांक 20 जानेवारी 2026 पासून सर्व शैक्षणिक संस्था आपल्या नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहतील, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, बजाज ऑटो लिमिटेड यांच्या टायटल स्पॉन्सरशिपखाली होत असलेल्या या स्पर्धेत 35 देशांमधील 29 संघांचे 171 आंतरराष्ट्रीय दर्जाचे रायडर्स सहभागी होणार आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमुळे पुणे शहर आणि परिसराला जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळणार असून, पर्यटन, क्रीडा आणि आर्थिक क्षेत्राला देखील चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, स्पर्धेच्या कालावधीत विशेषतः 19 जानेवारी रोजी वाहतूक व्यवस्थेतील बदल लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनास सहकार्य करावे.
