पुणे : आज माझ्यावर झालेल्या हल्ल्याला केवळ पुणे पोलीस जबाबदार आहेत. त्यांना हल्ला होणार हे माहिती होते. मात्र त्यानंतरही त्यांनी सिनेमातील पोलिसांसारखी केवळ बघ्याची भूमिका घेतली. महाराष्ट्राचे पोलीस दल भाजपने (BJP) विकत घेतले आहे, असा गंभीर आरोप करत ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) यांनी आज (9 फेब्रुवारी) निर्भय बनो सभेतून भाजप आणि पोलिसांवर सडकून टीका केली. (Senior journalist Nikhil Wagle criticized the BJP and the police from Nirbhay Bano Sabha.)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा करत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Vagale) यांच्यावर आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. असीम सरोदे यांच्या घरापासून ‘निर्भय बनो’ सभेला येत असताना डेक्कन भागातील खंडोजी बाबा चौकात आक्रमक भाजपच्या कार्यकर्त्यांनी वागळे यांची गाडी फोडली. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. तसेच त्यांच्यावर शाईफेक आणि अंडीही फेकण्यात आली.
यानंतर भाषणात बोलताना वागळे यांनी हल्ल्याचा थरारक प्रसंग सांगितला. तसेच पोलीस आणि भाजपवर गंभीर आरोप केले. कार्यक्रमाला येत असताना आमच्यावर जेव्हा हल्ला होत होता. तेव्हा मी प्रचंड धक्क्यात होतो. ज्या क्षणाला हल्ला होत होता. गाडीच्या काचा फुटत होत्या. गाडीची मागची काच फोडली त्यावेळी असीमने माझ्या डोक्यावर हात ठेवला. सोबत दोन मुली होत्या. एक पुढच्या सीटवर बसलेली होती. तिला मी खाली वाकवलं. त्यामुळे आमची सर्वांची डोकी वाचली. त्यामुळे जोपर्यंत आमची डोके वाचतील तोपर्यंत हल्लेखोरांनो तुमचं काहीही खरं नाही. असा इशारा यावेळी वागळे यांनी दिला.
ज्येष्ठ पत्रकार निखील वागळेंविरोधात गुन्हा दाखल; ‘निर्भय बनोची’ सभा उधळून लावण्याचा भाजपचा इशारा
पुणे हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे शहर आहे. मात्र गेल्या शंभर वर्षांपासून या शहराचा हल्लेखोरांचा इतिहास आहे. त्यामुळे या शहराला कलंक लागला आहे. 1942 साली देखील याच शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आचार्य अत्रे यांची देखील सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर नथुराम गोडसे देखील याच शहरातले आहेत. त्यामुळे आचार्य अत्रे यांनी म्हटल्याप्रमाणे आम्हाला मारणारे मेले पण आम्ही जिवंत आहोत.
पण मी अहिंसावादी माणूस असल्याने मी असे म्हणेल की, आम्हाला मारणारे देखील जिवंत राहो आणि आम्ही देखील जिवंत राहो. तसेच या सर्व हल्लेखोरांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन सांगतो की, मी तुम्हाला माफ केले. महात्मा फुले यांना देखील अशाच प्रकारे मारायला काही लोक आले होते. मात्र त्यांनी त्यांचे परिवर्तन केले आणि नंतर मारायला आलेले लोकचं त्यांचे कार्य करू लागले. त्यामुळे मला जरी संधी मिळाली, तर मी या भाजपवाल्यांचं परिवर्तन करून टाकेल.