Download App

Kasba by election : शैलेश टिळकांच्या नाराजीने भाजपची पळापळ; गिरीश महाजन पोचले केसरी वाड्यात…

  • Written By: Last Updated:

पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून आपल्या उमेदवारांची घोषणा आज (ता. 4 जानेवारी) करण्यात आली आहे. चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर कसब्यात भाजपचे माजी नगरसेवक हेमंत रासने यांची नावे जाहीर करण्यात आले आहेत.

दरम्यान, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना या निवडणुकीत डावलण्यात आल्याने मुक्त टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी आपली नाराजी उघड बोलून दाखवली. यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली असून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे संकट मोचक म्हणून ओळख असलेले मंत्री गिरीश महाजनही आज केसरी वाड्यात पोहोचले आणि त्यांनी टिळक यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

कसबा पोटनिवडणुकीची उमेदवार जाहीर झाल्यानंतर शैलेश टिळक यांनी एकही उमेदवार ब्राह्मण समाजाचा नसल्याने ब्राह्मण समाजावर अन्याय झाल्याची भावना लोकांमध्ये आहे. टिळक कुटुंबीयांना उमेदवारी दिली असती तर ही निवडणूक बिनविरोध होण्यास मदत झाली असती, असे स्पष्ट मत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले होते.

त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची चांगलीच पळापळ सुरू झाली आणि टिळक यांची नाराजी पक्षाला परवडणार नाही. यामुळे उमेदवारी मिळालेले रासने लगेचच केसरी वाड्यात गेले आणि त्यांनी शैलेश टिळक आणि त्यांचे सुपुत्र कुणाल टिळक यांची भेट घेतली.

यानंतर मंत्री महाजन यांनीही केसरी वाडा गाठला आणि शैलेश टिळक यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी महाजन यांनी आपल्या फोनवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शैलेश टिळक याचं बोलणं करून दिलं. फडणवीसांशी बोलताना शैलेश टिळक यांनी उमेदवारी न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र, तरीसुद्धा आम्ही पक्षासोबत आहोत, अशी ग्वाही देखील फडणवीसांना दिली आहे.

दरम्यान, टिळक कुटुंबीयांना अर्थात ब्राह्मण उमेदवार कसब्यात न दिल्यामुळे या मतदारसंघातील ब्राह्मण समाजातील अनेक पदाधिकारी आपली नाराजी बोलून दाखवत आहेत. शिवाय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी देखील आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. आता ब्राह्मणेतर उमेदवार देऊन भाजपने डाव तर टाकलाय मात्र, तो कितपत यशस्वी होणार हे आगामी निवडणुकीत पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Tags

follow us