पुणे : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीत बसून एखादा सही करून आदेश जर काढला तर ते केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission) बरखास्त करू शकतात. ते काहीही करू शकतात, अशी शेलक्या शब्दात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे राज्यमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह हे दोन्हीही एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगच बरखास्त करण्याची मागणी केली. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, उद्धव ठाकरे मातोश्रीत बसून काहीही करू शकतात. त्यांची मागणी हास्यास्पद आहे. घटनेने केंद्रीय निवडणूक आयोगाची नेमणूक केली जाते. असा आयोगाच बरखास्त करण्याची मागणी करत आहेत. त्यांनी काहीतरी लॉजिकने बोलले पाहिजे. लोकांमध्ये हसू होते.
शंभुराज देसाई म्हणाले की, शिवसेना संपवण्यासाठी सुपारी देण्याचा विषय नाही. त्यांनी स्वतः स्वतःच्या पायावर शिवसेना संपवण्यासाठी कुऱ्हाड मारून घेतली आहे. २०१९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाऊन त्यांनी स्वतःच शिवसेना संपवली आहे. २०१९ च्या अगोदर महाराष्ट्रातील शिवसेनेचे लोकमत उद्धव ठाकरे यांचे लोकमत काय होते. याचा जरा पाठीमागे जाऊन त्यांनी अंदाज घ्यावा. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीला गेल्यामुळे लोकांनी उद्धव ठाकरेंना ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकांमध्ये पाचव्या क्रमांकावर फेकले आहे. हे केवळ काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर गेल्याने ही अवस्था झाली आहे.
कुणालाही कोणी सुपारी देण्याच्या आवश्यकता नाही. लोकशाहीमध्ये जनता सुज्ञ आहे. त्याला नेमकं समजतं. काय योग्य, काय अयोग्य आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या कृतीनेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना संपवण्याचे काम महाविकास आघाडीत जाऊन केलेला आहे, असा आरोप शंभुराज देसाई यांनी यावेळी केला.