Download App

Video : गल्लीत कांदे विक्रेत्यांचा आवाज, विद्यार्थ्यांची लगबग अन् मोहोळचा ‘गेम’; CCTV फुटेज आलं समोर

  • Written By: Last Updated:

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा काल (दि.5) दुपारी कोथरूडमध्ये खून करण्यात आला. त्याच्या सोबत वावरणाऱ्या साथीदारांनीच त्याच्यावर गोळीबार करत त्याचा शेवट केला. नेमकी मोहळचा खून कसा झाला याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात मोहोळवर अगदी जवळून गोळ्या झाडल्याचे दिसून येत आहे. (Gangster Sharad Mohol Murder CCTV Footage)

Video : पत्नीचा फोटो लग्नाच्या शुभेच्छा अन्…; मोहोळनं हत्येपूर्वी ठेवलेले व्हॉट्सअप स्टेटस व्हायरल

CCTV फुटेजमध्ये नेमकं काय?

समोर आलेल्या फुटेजमध्ये शरद मोहोळ (Sharad Mohol) सुतारदरा परिसरात असणाऱ्या एका गल्लीतून चालत जात असल्याचे दिसून येत आहे. हाती आलेल्या फुटेजमध्ये कांदे विक्रेत्याचा आवाज, गल्लीत रिक्षा, शाळेचे विद्यार्थ्यांची लगबग, गल्लीत आपल्या दारासमोर गप्पा मारत बसलेले नागरिक सार काही सामान्य वातावरण आहे. तेवढ्यात आपल्या घरातून आपल्या लग्नाचा वाढदिवस म्हणून जेवण करून सहकाऱ्यांसोबत मोहळ मुख्य रस्त्यावर येत असताना दिसून येत आहे. त्यावेळी त्याच्या समोरच्या बाजूने दोघे येताना दिसत आहेत. तर एक जण मोहोळ याच्या पाठीमागून चालत आहे.

शरद मोहोळ कारागृहात असतानाच बिनविरोध उपसरपंच झाला होता….

गल्लीतून पुढे जात असतानाच मोहोळच्या पाठीमागून चालणाऱ्या व्यक्तीने अगदी जवळून गोळीबार केला. तर मोहोळच्या डाव्या हाताला उभ्या असलेल्या दोघांनी बाजूने फायरिंग केले. यानंतर हल्लोखोरांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. गोळीबार झाल्यानंतर मोहोळ क्षणाधार्त जमीनीवर कोसळला. त्यावेळी दोन जणांनी आरोपींनी पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या मोहोळला जवळीस एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मोहोळची हत्या ते आरोपींना अटक, आतापर्यंत काय घडलं?

शुक्रवारी दुपारी पुण्यातील कोथरूड परिसरात कुख्यात गुंड शरद मोहळवर गोळीबार केल्याचं वृत्त धडकलं आणि एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर सर्वांना आठवला तो मुळशी पॅटर्नचा थरार. मोहोळचा खून गँगवॉरमधून झाल्याचा पहिल्यांदा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, जस जशी तपासाची चक्र पुढे सरकरत गेली तसं तसं मोहोळचा गेम त्याच्या सुरक्षा रक्षक म्हणून वावरणाऱ्यांनीच केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.

शुक्रवारी (दि.5) शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता. घटनेपूर्वी साहील पोळेकर याने मोहोळसोबत त्याच्या घरी जेवण केले. जेवणानंतर मोहोळ आणि विठ्ठल गांडले, नितीन कानगुडे आणि साहील पोळेकर हे त्याचे साथीदार त्याचे बॉडीगार्ड म्हणून त्याच्यासोबत चालायला लागले. घरापासून काही अंतर पुढे जात नाही तोच त्याच्या मागून चालणाऱ्या त्याच्याच साथिदारांनी त्याचा गेम केला.

एकत्र जेऊन मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् बाहेर पडताच गोळ्या झाडल्या

आपल्या पाठीमागे असणाऱ्या साथिदारांच्या डोक्यात नेमकं काय शिजतय याची पुसटशी कल्पनाही नसलेल्या मोहोळवर आरोपींनी चार राऊंड फायर केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहोळला कोथरूड परिसरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मोहोळवर गोळीबार आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखं शहरभर पसरलं आणि खळबळ उडाली.

मोहोळच्या पाठीमागून चालणाऱ्या तिघांनी त्यांच्याजवळील पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या शरद मोहोळच्या मानेत, एक छातीत तर एक गोळी डोक्यात लागली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहोळला कानगुडे आणि अन्य दोघांनी पळ काढला. घटनेनंतर आरोपी पळून जावे यासाठी या तिघांचे अन्य चार साथीदार एक स्विफ्ट कार आणि एक SUV गाडी घेऊन हजर होते. मोहोळचा गेम करून या आरोपींनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून सातारच्या दिशेने वाहनातून पळायचं ठरवल होतं. मात्र गाड्यांचे नंबर ट्रेस करून पुणे पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करत शहरापासून जवळ असलेल्या शिरवळ भागात त्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपींकडून तीन पिस्तुले जप्त केली आहेत.

मनात नाराजी अन् शांत डोक्याने केला मोहोळचा गेम

मोहोळचा खून का केला असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित होत आहे. तर, ज्या आरोपींनी मोहोळवर गोळीबार केला ते सर्व जण गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचे सांगितले जात आहे. यातील साहील पोळेकर याने तर, हत्येच्या आधी काहीवेळ शरद मोहोळच्या घरी त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठीही सहभागी झाला होता. त्यातूनच त्यांनी मोहोळचा गेम करण्याचं प्लॅनिंग केलं आणि अतिशय शांत डोक्याने ते पूर्णपण केले.

साथीदार म्हणून वावरणारे मोहोळवर नाराज का होते?

वरवर शरद मोहोळचे साथीदार असल्याचे दाखवणारे मारेकरी शरद मोहोळवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. विठ्ठल गांडले याच्यासोबत शरद मोहोळची मुळशी तालुक्यात जुनी भांडणे होती तर, साहील पोळेकर याच्यासोबतदेखील जमीन आणि पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद झाले होते. त्यातूनच त्यांनी मोहोळच्या खूनाची योजना आखली. या मारेकऱ्यांना मोहोळची हत्या करण्यासाठी आणि त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी विरोधी टोळीने पेरलं होतं का? याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या सर्व घटनेत आपले साथीदार आणि बॉडिगार्ड म्हणून वावरणाऱ्यांच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय याचा अंदाज मोहोळला आला नाही.

follow us

वेब स्टोरीज