Ajit Pawar Death : ‘पिंपरी-चिंचवडचे’ शिल्पकार गेले; अजितदादांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

Ajit Pawar Death : उद्योगनगरीचा कायापालट करणारे, आधुनिक पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे

  • Written By: Published:
Ajit Pawar Photo

Ajit Pawar Death : उद्योगनगरीचा कायापालट करणारे, आधुनिक पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. शहराशी अजित पवार यांचे जिव्हाळ्याचे, प्रेमाचे नाते होते. शहरावर प्रेम करणारे अजितदादा यांच्या निधनामुळे उद्योगनगरी पोरके झाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. बारामती माझी जन्मभूमी असली, तरी पिंपरी-चिंचवड माझी कर्मभूमी असल्याचे अजित पवार नियमीत सांगत असत.

अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात पिंपरी-चिंचवडमधूनच झाली होती. त्यांनी 1992 मध्ये पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हा पिंपरी-चिंचवडचा बारामती लोकसभा मतदारसंघात समावेश होता. या निवडणुकीत अजित पवार लोकसभेत निवडून गेले होते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सलग 15 वर्षे सत्ता होती.

या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगिण विकास त्यांनी केला. शहरामध्ये चांगल्या दर्जाचे रस्ते, सार्वजनिक बससेवा वाढवणे, पर्यायी वाहतुकीचे मार्ग उपलब्ध करून देणे इत्यादीचा समावेश आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी शहराच्या विकास कामांसाठी मोठ्या निधीची तरतूद केली.

अजित पवार यांच्या मदतीमुळेच कुठल्याही अडचणीविना केंद्र सरकारकडून प्रकल्पासाठीचा निधी मिळवणे सोपे गेले. केंद्र सरकारकडून पिंपरी महापालिकेला जवाहरलाल राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत विविध प्रकल्प राबवण्यासाठी 2600 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने कामाला चांगली गती मिळाली. या निधीतून घनकचरा व्यवस्थापन, रस्ते व बस वाहतूक, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प झाले. पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथे 200 एकर जागेत पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 33 एकर क्षेत्रात मध्यवर्ती व्यापार केंद्र प्रकल्प साकारत आहे.

शहराची शान असलेले सायन्स पार्क हे याच प्रकल्पाचा भाग आहे. लोकहितासाठीचे अनेक विकासप्रकल्प अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आले. त्यात जेएनयूआरएमच्या माध्यमातून गरीबांसाठी गृहप्रकल्प, निगडी ओटास्कीम, रस्ते, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, उद्याने तयार झाली. शहरातील भक्ती-शक्ती उद्यान, पुणे-मुंबई रस्ता रुंदीकरण, रेल्वे उड्डाणपूल, आचार्य अत्रे सभागृह, उद्यानांचा विकास आदी योजना अजित पवार यांनी प्रत्यक्षात आणल्या. प्रा. रामकृष्ण मोरे यांची आठवण या शहराला राहावी, यासाठी चिंचवडच्या प्रेक्षागृहाला प्रा. रामकृष्ण मोरे यांचे नाव देण्यात आले. अजितदादांनी बारामतीप्रमाणेच पिंपरी-चिंचवड शहरावर प्रेम केले. अजितदादा भल्या पहाटे शहरात येवून विकासकामांची पाहणी करत.

विश्वास बसणार नाही असा क्षण, महाराष्ट्राने दूरदृष्टी असलेला नेतृत्वगुणी नेता गमावला; नीलम गोऱ्हे यांनी वाहिली श्रद्धांजली

त्यामुळे पदाधिकारी, अधिकाऱ्यांवर वचक राहत होता. परिणामी, कामाच्या दर्जाशी कधीही, कोणतीही तडजोड झाली नाही. शहरातील कामे गुणात्मक झाली आहेत. अजित पवार पिंपरी- चिंचवड साठी ते आठवड्यातून एक दिवस तरी वेळ देत असतात. अजित पवार यांचे पिंपरी-चिंचवडशी अतूट नाते राहिले आहे. अनेक दशकांपासून या शहराच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून, महापालिकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राखण्यात ते नेहमीच पुढाकार घेत असत. पिंपरी-चिंचवडला “दादांचे शहर” असेही अनेकदा म्हटले जात असत.

अजितदादांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

उद्या सकाळी 11 वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

follow us