पुणे : शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची स्थापना करण्यात आली आणि या पक्षात जोरदार इनकमिंग सुरु असल्याचं चित्र आजघडीला पाहायला मिळत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पुण्यात आधीच ठाकरे गट, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना गळाला लावलेले असताना आता शिंदे यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीकडे वळवत पुण्यात राष्ट्रवादीलाच धक्का दिला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष गणेश सातव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे. हा प्रवेश 22 जानेवारी रोजी ठाणे येथील हॉटेल टीप टॉप या ठिकाणी हा प्रवेश झाला.
कोण आहेत गणेश सातव ?
सातव हे मूळचे पुण्याजवळील वाघोली येथील आहेत. तरुण मुलांचा उत्तम संपर्क हे सातव यांचं बलस्थान आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली महापालिका निवडणूक आणि त्यात पुणे महापालिकेत नवीनच समाविष्ट झालेले वाघोली गाव या सगळ्यात एका युवा चेहऱ्याने पक्ष सोडल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी हे प्रवेश घडवून आणले असल्याने पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचा उघड संघर्ष पाहायला मिळणार, असं बोललं जातं आहे.
दरम्यान, आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची ध्येय धोरणे पोहचवण्याचे काम करणार असून पुणे जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी जीवाचं रान करणार असल्याची प्रतिक्रिया गणेश सातव यांनी दिली आहे.