Download App

“चौकशीला आले होते की पार्ट्या झोडायला?” डॉ. सापळे समितीच्या बिर्याणी मेजवाणीवर धंगेकरांचा संताप

ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी दाखल झालेल्या समितीला देण्यात आला खास पाहुणचार

Image Credit: Letsupp

पुणे : कल्याणीनगर कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी दाखल झालेल्या समितीला देण्यात आलेला खास पाहुणचार सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. एका बाजूला डॉ. पल्लवी सापळे (Dr. Pallavi Sapale) यांच्या अध्यक्षतेमधील चौकशी समिती ससूनमध्ये (Sassoon Hospital) दाखल झाल्यावर तणावपूर्ण वातावरण होते, तर दुसरीकडे सदस्यांनी पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध बिर्याणीवर ताव मारल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. (special hospitality given to the committee which was appointed to investigate the allegations of tampering with the blood report in pune rash driving case)

याच मेजवाणीवर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनीही संताप व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना धंगेकर म्हणाले, हे डॉक्टर चौकशी करण्यासाठी आले होते की पार्ट्या झोडण्यासाठी आले होते? जरी कोणी बिर्याणी आणून दिली तरी आपण ती खायची की नाही? हे ठरवायला पाहिजे होते. दोन जणांचा मृत्यू झाला आहे, आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न झाले, अशावेळी थोडा तरी वेदनशीलपणा दाखवायला जायला पाहिजे होता. त्यामुळे चौकशीच्या नावाखाली पुण्यात येऊन बिर्याणीवर ताव मारणारी समिती बरखास्त करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

समितीसाठी बिर्याणीची मेजवाणी :

वैद्यकीय शिक्षण विभागाने स्थापन केलेली चौकशी समिती मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता ससून रुग्णालयात आले. घटनास्थळाच्या पाहणीनंतर प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात झाली. चौकशी दिवसभर चालणार असल्याने सदस्यांनी दुपारी जेवणासाठी ब्रेक घेतला. त्यावेळी त्यांच्यासाठी खास बिर्याणी ऑर्डर करण्यात आली होती. बिर्याणीची मेजवानी अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या दालनात सुरू होती. मात्र त्याचवेळी चौकशीसाठी बोलाविलेल्या कर्मचारी, परिचारिकांना ताटकळत बसविले होते, त्यांना जेवणासाठीही मनाई करण्यात आली होती, अशी माहितीही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

कारगिल युद्धावेळी आमच्याकडून शांतता कराराचं उल्लंघन; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांची जाहीर कबुली

निवडीवर प्रश्नचिन्ह

एसआयटी समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे आहेत. तर, डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. सुधीर चौधरी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या SIT समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर आधीच भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्या मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होत्या. त्यावेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. आता जेजे रुग्णालयात अनेक प्रकरणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहेत. जेजे रुग्णालयात औषध, यंत्रसामग्री खरेदीच्या बिलांवर 5 ते 10 टक्के कमिशन घेतल्याशिवाय डॉ. सापळे सह्याच करत नाहीत, असा गंभीर आरोप शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी केला होता. हा मुद्दा विधानसभेतही चांगलाच गाजला होता.

Tags

follow us

वेब स्टोरीज