पुणे पदवीधर निवडणुकीच्या उमेदवारीवरुन (Pune) ठाकरे गटाच्या शिवसेनेतच नाराजीचा सूर उमटला आहे. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसच्या चिन्हावर स्वीकृत नगरसेवक झालेल्या सुनील मोदी यांना ठाकरे गटाने पुणे पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी दिली आहे. पक्षाचे सचिव अनिल देसाई यांच्या स्वाक्षरीने त्यांना एबी फॉर्म देण्यात आला असून, मोदी यांनी आज उमेदवारी अर्जही दाखल केला. मात्र, या निर्णयामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये पुन्हा संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे.
मोदी यांच्या उमेदवारीवरुन शिवसैनिकांकडून पक्षाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महापालिका निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या अपयशासाठी मोदी यांना जबाबदार धरत शिवसैनिकांनी यापूर्वीही उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसच्या माध्यमातून महापालिकेत स्वीकृत नगरसेवकपद मिळाल्यानंतर पदाधिकारी निवडीच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे शहरप्रमुख विशाल देवकुळ यांनी मोदी यांच्या घरासमोर जाऊन आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे आता त्यांनाच पदवीधर निवडणुकीत पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाल्याने जुन्या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.
स्मिता जाधव-पाटील पदवीधरच्या रिंगणात; भाजपकडून; चाणक्य सतेज पाटलांची कोंडी ?
दरम्यान, ठाकरे गटाकडून कोल्हापुरातील पदाधिकारी बदलल्यानंतर पक्षाच्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. विविध कार्यक्रम आणि पक्षाच्या उपक्रमांमध्ये शिवसैनिक सक्रिय होत असताना मोदी यांची अनेक कार्यक्रमांतील अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरली आहे. अशा पार्श्वभूमीवर पक्षाने मोदी यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत त्यांना पुणे पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
मोदी यांच्या उमेदवारीनंतर शिवसैनिकांकडून पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भूमिकेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारे शिवसैनिक आणि त्याचा लाभ घेणारे मोदी, अशी भावना काही शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटाकडून मोदी यांच्यावर सातत्याने कृपादृष्टी दाखवली जात असल्याचा आरोपही केला जात आहे. त्यामुळे पुणे पदवीधर निवडणुकीतील उमेदवारीने केवळ निवडणुकीची चर्चा रंगवली नसून, ठाकरे गटातील अंतर्गत नाराजीही पुन्हा समोर आणली आहे.
