पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाले आहे. बापट यांची प्रकृती खालावललल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने नजर ठेवून होते. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर आज सायंकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी होणार आहेत.
आज गल्ली ते दिल्ली अशी सर्वत्र सत्ता असलेल्या भाजपच्या जुन्या नेत्यांची नाव घ्यायची झाली, तर त्यामध्ये पुण्यातील भाजप नेते म्हणून गिरीश बापट यांच्या नावाची चर्चा होतेच. पुण्यातील महापालिका ते दिल्लीतील संसद असा मोठा राजकीय पल्ला गाठत असताना त्यांनी गेली पाच दशके पुण्यातील राजकीय-सामाजिक कामात त्यांनी स्वतःचा मोठा ठसा उमठवला होता.
गिरीश बापट यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात संघाच्या मुशीतून झाली. त्यामुळे खासदार, मंत्री झाले तरीही गिरीश बापट संघाच्या कार्यक्रमात कायम दिसत. गिरीश बापट यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५० रोजी पुण्यात झाला. तळेगाव दाभाडेमधून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग या शाळेत झाले. पुढे त्यांनी पुण्यातीलच बीएमसीसी कॉलेज मधून वाणिज्य शाखेची पदवी घेतली.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गिरीश बापट यांनी १९७३ साली टेल्कोमध्ये नोकरी सुरु केली. याच काळात त्यांनी कामगारांच्या मागण्यांसाठी अनेकदा लढा दिला. यातूनच त्यांच्या राजकीय जीवनात प्रवास सुरु झाला. दरम्यानच्या काळात देशात आणीबाणी लागली. आणीबाणीच्या विरुद्ध काम केल्यामुळे त्यांना आणीबाणीमध्ये १९ महिन्यांचा कारावास भोगावा लागला. नाशिक जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होत.
आणीबाणीच्या काळात तुरुंगात शिक्षा भोगून आल्यानंतर गिरीश बापट यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. १९८३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. याचा काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते.
१९९५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढविली अन् निवडून आले. पुण्यातील कसबा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर पुढे सलग २०१४ पर्यंत ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले. दरम्यान १९९६ साली त्यांना भाजपाने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण बापट यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले.
राज्यात सलग निवडून येत असताना त्यांनी पुण्यातील भाजपवर आपले वर्चस्व ठेवले होते. २०१४ साली राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले.देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्री केले गेलं, सोबतच पुण्याचं पालकमंत्री पदही त्यांना देण्यात आलं होत. २०१९ मध्ये त्यांना खासदारकीचे तिकीट देण्यात आलं. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल ९६ हजार मतांनी पराभव केला.
गेले पाच वर्षे त्यांनी पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतिनिधित्व केले. पण गेल्या काही महिन्यापासून प्रकृती अस्वस्थतेमुळे ते सक्रियपणे काम करू शकत नव्हते. पण पुण्यात कसबा मतदारसंघात लागलेल्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी ते त्याही अवस्थेमध्ये आले होते.
जनसंघापासून राजकारणाला सुरुवात करून नगरसेवक पदापासून बापट यांनी आपला राजकीय प्रवास सुरु केला. तीन वेळा नगरसेव, पाच वेळा आमदार आणि खासदार असा मोठा राजकीय प्रवास त्यांनी केला होता.