पुण्यात ‘एमएच-12’चा अध्याय संपणार! आता वाहनांना मिळणार ‘एमएच-61’ची नवी ओळख

सध्या सुरू असलेल्या एमएच 12 या पर्यायांमध्ये तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता असल्याने स्वतंत्र नवीन मालिका सुरू करण्याचा पर्याय पुढे आला.

Pune MH 12 61

पुण्यात 'एमएच-12'चा अध्याय संपणार! आता वाहनांना मिळणार 'एमएच-61'ची नवी ओळख

पुण्यातील वाहनांच्या नोंदणी क्रमांकाची (Pune) सध्याची ‘एमएच-12’ मालिका लवकरच संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO) वाहनांसाठी ‘एमएच-61’ ही नवीन नोंदणी मालिका सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. सध्याची मालिका आणखी दोन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता असल्याने नवीन मालिकेचा निर्णय तातडीने घेण्यात आला आहे.

‘एमएच-12’ मालिका कायम ठेवण्यासाठी विविध पर्यायांचा विचार सुरू होता. त्यामध्ये विद्यमान मालिकेत तांत्रिक बदल करून पुढील क्रमांक देण्याचाही प्रस्ताव होता. मात्र, या पर्यायांमध्ये तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता असल्याने स्वतंत्र नवीन मालिका सुरू करण्याचा पर्याय पुढे आला. त्यानुसार पुण्यासाठी ‘एमएच-61’ ही मालिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, पुणे आरटीओकडून ‘एमएच-12’नंतर वाहन क्रमांक देण्यासाठी इतर पर्यायही सुचवण्यात आले होते. मात्र, या पर्यायांमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वाहन नोंदणीची प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी ‘एमएच-61’ ही स्वतंत्र मालिका सुरू करणे अधिक सोयीचे ठरणार असल्याचे आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे आरटीओच्या नोंदीनुसार, जुलै 2026 पर्यंत 44 लाख 71 हजारांहून अधिक वाहनांची नोंदणी झाली आहे. वाहनांची संख्या सातत्याने वाढत असल्याने नोंदणी क्रमांकांची सध्याची मालिका वेगाने संपत आहे. त्यामुळे ‘एमएच-61’ ही नवीन मालिका सुरू झाल्यानंतर वाहनांच्या नोंदणीतील संभाव्य अडथळे दूर होऊन प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

Exit mobile version