Download App

सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत ठाकरे गट पुरविणार रसद; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई : पुढील निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढविणार आहे, त्यामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्यामागे ताकद उभी करा असे आदेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. मुंबईत ठाकरे गटाची लोकसभा निवडणूक आणि पक्षबांधणीच्या अनुषंगाने आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.  या बैठकीत त्यांनी याबाबतचे आदेश दिले. (Uddhav Thackeray ordered Shiv Sena office bearers to try for Supriya Sule’s victory in Baramati Lok Sabha constituency)

उद्धव ठाकरे यांनी गत बुधवारपासून राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघातील जमिनीवरील परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. “आपण महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवू, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या विरोधात प्रत्येक जागेवर एक समान उमेदवार ठेवू, त्यामुळे तुमच्या मतदारसंघात कोणता पक्ष लढत आहे, हे न पाहता त्यांचा पराभव करण्यासाठी कामाला लागा.” असे ठाकरे यांनी त्यांचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना सांगितले.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोनदा टक्कर; आता अजय राय यांच्यावर काँग्रेसकडून उत्तर प्रदेशची मोठी जबाबदारी !

वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी बुधवारी ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकींमध्ये ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि रावेर या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. त्यानंतर गुरुवारी अहमदनगर, नाशिक आणि दिंडोरीचा आढावा घेतला. तर काल (शुक्रवार) आणि आज (शनिवारी पश्चिम महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. सर्व विद्यमान खासदार आणि आमदारांव्यतिरिक्त, माजी खासदार आणि आमदार आणि त्या प्रदेशातील निवडणुकीत पराभूत झालेल्यांनाही या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते.

ना ईडी, ना मनोमिलन… अजितदादा-शरद पवारांची भेट चोरडियांच्या ‘3 हजार’ कोटींच्या टीडीआरसाठी?

काँग्रेसचा मात्र स्वबळाचा सूर :

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र काँग्रेसने बारामतीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेसनेही नुकताच बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यानंतर बोलताना निरीक्षक कुणाल पाटील म्हणाले, पुण्यासह शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातही काँग्रेसची मोठी ताकद आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर-वेल्हा-मुळशी आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे बारामतीतून काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us