Umesh Tagunde’s response to the viral videos : पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातील आध्यात्मिक गुरु म्हणून ओळख असलेल्या उमेश आप्पा तागुंदे यांचे काही व्हिडीओ सध्या सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये त्यांच्या महिला आणि पुरुष भक्तांकडून त्यांचे पाय पाणी व दुधाने धुतले जात असून, त्यानंतर तेच पाणी आणि दूध प्राशन केले जात असल्याचे दिसत आहे. या दृश्यांमुळे सामाजिक माध्यमांवर तीव्र चर्चा सुरू झाली असून, हा प्रकार श्रद्धेचा भाग आहे की अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये अनेक भक्त उमेश तागुंदे यांच्यासमोर नतमस्तक होत त्यांच्या पायांचे पूजन करताना दिसतात. काही ठिकाणी पाय धुतल्यानंतर जमा झालेले पाणी आणि दूध भक्तांकडून प्राशन केले जात असल्याचेही दिसून येते. या पार्श्वभूमीवर उमेश तागुंदे यांच्यावर टीका होत असताना त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना उमेश तागुंदे यांनी सांगितले की, आपण कोणत्याही भक्ताला पाय धुण्यास किंवा ते पाणी पिण्यास सांगत नाही. भक्त त्यांच्या श्रद्धेपोटी आणि भावनेतून हे करत असतात. उलट आपण अशा गोष्टींना विरोधच करतो, असे त्यांनी म्हटले.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, जसे त्यांनी स्वतः आपल्या गुरुंचे पाय धुऊन त्यांचे चरणोदक घेतले होते, त्याच भावनेतून काही भक्त आपल्याबाबत वागतात. उमेश तागुंदे यांना त्यांच्या अनुयायांकडून “पप्पा” या नावाने संबोधले जाते. याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, त्यांनी कधीही कोणाला स्वतःला “पप्पा” म्हणण्यास सांगितले नाही. एका भक्ताने प्रेमाने त्यांना “पप्पा” म्हणण्यास सुरुवात केली आणि नंतर इतर भक्तांनीही तेच संबोधन स्वीकारले.
पुणे मनपात नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तीपत्रे देत 150 हून अधिक तरुणांची कोट्यवधींची फसवणूक
दरम्यान, पाय धुतल्यानंतरचे पाणी पिण्याचा प्रकार अनेकांना आक्षेपार्ह आणि अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारा वाटत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. सामाजिक माध्यमांवर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी या प्रकारावर कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर कारवाईची मागणीही केली आहे. तर दुसरीकडे, तागुंदे यांचे समर्थक हा विषय श्रद्धा आणि गुरु-शिष्य परंपरेशी संबंधित असल्याचे सांगत आहेत.
कोण आहेत उमेश आप्पा तागुंदे?
उमेश आप्पा तागुंदे हे पुण्यातील वारजे माळवाडी येथे वास्तव्यास असून त्यांचा मोठा भक्तपरिवार आहे. देवी कालूबाई अर्थात आई कालेश्वरी यांच्या भक्तीशी संबंधित धार्मिक कार्यक्रम, प्रवचने आणि पारंपरिक दरबार आयोजित करण्यासाठी ते ओळखले जातात. सामाजिक माध्यमांवरही त्यांची मोठी उपस्थिती असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे व्हिडीओ नियमितपणे प्रसारित केले जातात.
स्वतःबद्दल माहिती देताना तागुंदे यांनी सांगितले की, त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. याशिवाय त्यांनी दुग्धव्यवसाय, भाजीपाला व्यवसाय, हॉटेल व्यवसाय तसेच जागांची खरेदी-विक्री अशा विविध क्षेत्रांत काम केले आहे. त्यांच्या कुटुंबाकडे पूर्वी मोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय होता आणि सध्या देखील ते काही प्रमाणात हा व्यवसाय करतात. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओंमुळे उमेश तागुंदे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावरील वादाला नव्याने तोंड फुटले आहे. त्यांच्या समर्थकांकडून हा श्रद्धेचा भाग असल्याचे सांगितले जात असले तरी, या प्रकारावर सामाजिक आणि कायदेशीर पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.
