पुणे मनपात नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तीपत्रे देत 150 हून अधिक तरुणांची कोट्यवधींची फसवणूक
नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा शिवाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
Youths defrauded with the lure of jobs : पुणे महानगरपालिकेत शिपाई ते अभियंता पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा शिवाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, 150 हून अधिक उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्रे देण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी उमेदवारांकडून दोन लाख ते 15 लाख रुपये घेत होते. पुणे मनपाचे बनावट लेटरहेड, अधिकृत शिक्के, ओळखपत्रे आणि नियुक्तीपत्रे तयार करून उमेदवारांना नोकरी मिळाल्याचा विश्वास दिला जात होता. एवढेच नव्हे तर खोट्या स्वाक्षऱ्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे उमेदवारांच्या बँक खात्यात एक ते दोन महिन्यांचा पगारही जमा केला जात होता. त्यामुळे अनेक उमेदवारांना आपण प्रत्यक्षात पुणे मनपात रुजू झालो असल्याचे वाटत होते.
या प्रकरणाचा उलगडा एका तरुणाच्या तक्रारीमुळे झाला. मनपात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली त्याच्याकडून तब्बल 45 लाख रुपये उकळण्यात आले होते. मात्र नोकरी न मिळाल्याने त्याने पोलिस आणि मनपा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर झालेल्या चौकशीत संपूर्ण रॅकेट उघडकीस आले. या प्रकरणी पुणे मनपाच्या प्रशासकीय अधीक्षक शलाका विनायक घोगे यांनी अधिकृत तक्रार नोंदवली आहे.
चाकणमधील 20 कंपन्यांचे स्थलांतर म्हणजे धोक्याचा इशारा; शरद पवारांच्या सरकारला तातडीच्या सूचना
तपासात आरोपींकडून 150 हून अधिक जणांना देण्यात आलेल्या बनावट नियुक्तीपत्रांची माहिती समोर आली आहे. उमेदवारांच्या खात्यात पगार जमा केल्याच्या नोंदी असलेली एक्सेल शीटही पोलिसांच्या हाती लागली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात बनावट नियुक्तीपत्रे, ओळखपत्रे आणि वेतन पावत्या छापण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे.
पोलिस तपासानुसार, राजेंद्र खेडकर आणि शिवानंद पाटील यांनी सुरुवातीला काही जणांना नोकरी मिळवून देण्याचे काम केले होते. त्यानंतर या माध्यमातून मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो हे लक्षात आल्यानंतर त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने बनावट भरतीचे जाळे उभे केले. पुणे मनपाचे बनावट लेटरहेड आणि शिक्के तयार करून उमेदवारांची फसवणूक सुरू करण्यात आली.
या रॅकेटमध्ये लीना गायकवाड हिची भूमिकाही महत्त्वाची असल्याचे तपासात समोर आले आहे. उमेदवारांचा विश्वास संपादन करण्यासाठी तिने ‘लीना फॅलिसिटी सर्व्हिसेस’ नावाने बँक खाते सुरू केले होते. या खात्यामार्फत उमेदवारांच्या खात्यात बनावट पगार जमा केला जात होता. फसवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या काही बँक खात्यांच्या धारकांना दरमहा 20 ते 40 हजार रुपये मोबदला दिला जात असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे.
नालसार 2026 बॅचच्या पदवीधरांना मोठा दिलासा; दोन तासांत मागे घेतला वकिली नोंदणी रोखण्याचा आदेश
सध्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात 45 लाख रुपयांच्या फसवणुकीची नोंद असून, 17 जणांची एकूण 2 कोटी 2 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दोन जणांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल आहे. तर स्वारगेट पोलिस ठाण्यातही लाखो रुपयांच्या फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी असण्याची शक्यता असून, पोलिसांकडून आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि इतर संबंधित व्यक्तींचा सखोल तपास सुरू आहे. फसवणुकीला बळी पडलेल्या इतरांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.