पुणे : स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करणाऱ्या व दिवसेंदिवस वाढत असलेल्या ऑनलाईन व्यापाराशी टक्कर देणाऱ्या व्यापारी वर्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात (Union Budget) कोणतीही ठोस घोषणा नसल्याने व्यापारी वर्गात नाराजीचे वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया (Mahendra Pitaliya) यांनी दिली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना महेंद्र पितळीया म्हणाले की, व्यापारी हे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करत असतात. त्यांचा आणि त्यांच्याशी संबंधीत येणाऱ्या अडचणीबाबत या अर्थसंकल्पात काहीच विचार करण्यात आलेला नाही.
शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत अनेक योजनांची घोषणा तसेच सात लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना करमाफी ही मध्यमवर्गीयांसाठी दिलासा देणारी बाब आहे. तसेच दैनंदिन वापरातील मोबाईल ,टी.व्हि., इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होतील हे स्वागतार्ह आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्था अधिक समृद्ध होण्यासाठी फार्मामधील संशोधनासाठी नवीन संशोधन योजनेची घोषणा स्वागतार्ह आहे. नेट झिरो कार्बन साठी ग्रीन ग्रोथ, ग्रीन उद्योग, ग्रीन एनर्जीवर भर दिल्याने भविष्यात याचे सकारसात्मक परिणाम जाणवतील, असे पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया यावेळी म्हणाले.