Download App

वारकऱ्यांना सर्व सोई-सुविधा मिळणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुण्यात शब्द

Devendra Fadnavis : येत्या काळात वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : येत्या काळात वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पुण्यात दिली. ते आज पुण्यातील विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपल्या राज्यात वारीचे महत्व मोठे आहे. देहू, आळंदी आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्राकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरीता वर्षांनुवर्षे, शतकानुशतके अडचणीचा सामना करुन वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आशेने पंढरपूरकडे मार्गक्रमण करीत असतात. वारीत पोहचू न शकणारे भाविक आपआपल्या देशातून दर्शनाचा लाभ घेतात, त्यामुळे आपली वारी आता वैश्विक झाली आहे.

वारकऱ्यांना योग्य प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजे, रस्ते रुंद झाले पाहिजे, पालखी मार्ग वेगळा करुन त्या मार्गावर सर्व प्रकारच्या सोई असल्या पाहिजे यादृष्टीने काम होत आहे. वारकऱ्यांना पालखी तळावरही विविध सोई-सुविधा देण्याकरीता त्याठिकाणी भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली असून त्यानंतर केंद्र सरकारच्या मदतीने कामे करण्यात येईल. येत्या काळात वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वर्तुळाकार मार्गाबाबत आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करुन त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. असेही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुण्याहून सातारा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबईकडे जाताना वाहतूक कोंडी सोडविण्यासोबत औद्योगिक विकासाला लागणाऱ्या पूरक बाबीचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्यात विविध पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकरिता मोठ्या प्रमाणात ई-बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून आगामी काळात 1 हजार ई-बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यास मदत होणार आहे.

आगामी काळात सर्व सोई-सुविधांयुक्त महत्त्वाचे शहर म्हणून पुणे शहर ओळखले जाईल. पुणे नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नामकरण करण्याबाबत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येईल, आणि केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. पुण्याच्या मेट्रोचे एक एक टप्पे पूर्ण करण्यासोबत नवीन टप्पे मंजूर करण्याचे काम सुरु आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी 3 लाख 50 हजार प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. हे पाहता पुणे शहराला मेट्रोची आवश्यकता लक्षात येते. त्यामुळे मेट्रोचे जाळे अधिक विस्तारित करण्याचे काम करण्यात येत आहे.

तर यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या संकल्पनेतून श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम पालखी मार्गांचे बांधकाम होत आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षांच्या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक महामार्ग निर्माण झाले आहेत, असं मोहोळ म्हणाले.

तर सहकार मंत्री वळसे पाटील म्हणाले, पुणे शहर एक मोठे केंद्र झाले आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्याकरीता पुणे ते छत्रपती संभाजीनगर, नाशिक तसेच तळेगाव ते चाकण रस्त्यांची प्रलंबित कामे करुन प्रश्न मार्गी लावावी. देहू, आळंदी आणि पंढरपूर विकास आराखड्याला गती देण्याकरीता केंद्र शासनाने सहकार्य करावे, असे वळसे पाटील म्हणाले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पालखी महामार्गांवरून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध सुविधा करण्यात आल्या आहेत दिवसेंदिवस वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता पालखीतळाच्या ठिकाणी कायमस्वरूपी निवारा आणि शौचालयाची व्यवस्था करावी, अशी सूचना करुन वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना सहकार्य करण्यात येईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुण्यातील नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देणार, नितीन गडकरींची ग्वाही

यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, प्राधिकरणाचे मुख्य प्रबंधक अंशुमाली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

follow us