पुणे : माझा मुलगा रुपेश मोरे (Rupesh More) याला मागील एक महिन्यापासून धमक्या येत आहे. व्हाट्सअप चॅटिंग तसेच फोनवरून त्याला ३० लाख रुपयांची खंडणी मागितली जात आहे. तसेच ‘तू हलके में मत ले… वरणा तुझे समज में आयेगा… इलेक्शन के टाईम तुझे देख लेंगे, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहे. ४ फेब्रुवारीला पहिल्यांदा जेव्हा अशा प्रकारे धमक्या आल्या तेव्हा आम्ही लगेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर हा प्रकार थांबला होता. मात्र, पाच-सहा दिवसानंतर पुन्हा हा प्रकार सुरु झाला असून मागील एक महिन्यापासून धमक्या येत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी सांगितले.
मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या मुलाला गेल्या एक महिन्यांपासून धमक्या तसेच ३० लाख रुपयांची खंडणी मागितली जात आहे. तसेच त्यासाठी त्याच्या लग्नाचे बनावट प्रमाणपत्र बनवून धमकी दिली जात आहे. सुरुवातीला आम्ही कोणीतरी खोडसाळपणा करत आहे म्हणून दुर्लक्ष केले. मात्र, मागील महिन्यांपासून हा प्रकार सुरु असल्याने आम्ही भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दिली आहे. आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास असून यामागे जे कोणी असेल त्यांना शोधून योग्य कारवाई करतील, असे वसंत मोरे यांनी सांगितले.
Vasant More Pune : मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी; खंडणी द्या अन्यथा…
वसंत मोरे म्हणाले की, एका मुस्लिम महिलेच्या नावाने बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे. तसेच त्या महिलेचा भाऊ असे सांगून व्हाट्सअप चॅटिंगद्वारे ३० लाख रुपयांची खंडणी दे. खराडी ई-ऑन आयटी पार्क येथे एका कारमध्ये ३० लाख रुपयांची बॅग आणून ठेव असे सांगितले जात आहे. तसेच तू आम्हाला किरकोळ मध्ये घेऊ नको. अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत तुला बरोबर सगळं समजेल अशी धमकी दिली जात आहे. सुरुवातीला आम्हला वाटलं कोणीतरी खोडसाळ पणा करत आहे. म्हणून आम्ही दुर्लक्ष केले होते. पण हा प्रकार जवळपास एक महिन्यापासून सुरु असल्याने आम्ही पोलिसांत तक्रार दिली आहे. परंतु, आम्ही कोणालाही घाबरत नाही. आमच्या कुटुंबावर कोणी वाकडया नजरेने पाहत असेल तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ. आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास असून पोलीस त्यांचे काम योग्यरित्या करतील, असे देखील मोरे यांनी सांगितले.