Download App

Vasant More : नाव घेतलं की अख्खं शहर हलतंय; ठाकरेंच्या शिलेदारची सूचक पोस्ट

  • Written By: Last Updated:

भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची एक जागा रिक्त झाली आहे. त्यानंतर आता या ठिकाणी कधी पोटनिवडणूक जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अद्याप निवडणुकांबाबत कोणतीही स्पष्टता नसताना सर्वच पक्षांकडून या जागेसाठी इच्छूकांनी आपापल्या पद्धतीने कंबर कसण्यास सुरूवात केली आहे. दोनच दिवसांपूर्वी मनसे नेते वसंत मोरे यांनी आपण जर पक्षाने मला संधी दिली तर मी निवडणुकीसाठी तयार आहे असे विधान केले होते. त्यानंतर आज मोरेंनी फेसबुकवर एक सूचक पोस्ट टाकली आहे. त्यांच्या या पोस्टमधून त्यांनी प्रस्थापितांना चांगलाच इशारा दिला आहे.

 

मोरेंची फेसबुक पोस्ट नेमकी काय?

मनसे नेते वसंत मोरे यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये निवडणुका होतील ना होतील हा नंतरचा विषय आहे, उमेदवारी मिळेल ना मिळेल हा त्यापेक्षाही नंतरचा विषय आहे,पण पुण्यात वातावरण फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वसंत (तात्या) मोरेच तयार करू शकतो, कारण नाव घेतलं की अख्खं शहर हलतय… “क्या बोलती पब्लिक” ? Don’t Underestimate Me And My Party Because We Are Also In The Race. अशी सूचक पोस्ट शेअर केली आहे. मोरेंची ही पोस्ट भाजप आणि काँग्रेससाठी असल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे.

लोकसभेबाबत काय म्हणाले होते मोरे?

दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले होते की, ”पक्षानं जर संधी दिली तर मी निवडणुकीसाठी तयार आहे.” ते म्हणाले, ”2017 ची पुणे मनपाची निवडणूक पाहिली तर मध्यमवर्गीय उमेदवार होते, तरीही पुणे शहरातील मतदान पाहता 3 लाख 79 हजार मतं आहेत. पोटनिवडणुकीत कोण मोठा तुल्यबळ नेता धाडस करणार आहे.” ”मनसे कार्यकर्ता जर झाडून कामाला लागला तर चमत्कार घडू शकेल.” ही पोटनिवडणूक लढवण्याची तुमची इच्छा आहे का? असं त्यांना विचारलं असता ते म्हणाले, ”निवडणूक लढवण्यासाठी इच्छा का नसावी? माझं काम चांगलं आहे. राजकारणात असेल तर मोठी स्वप्न पाहिली पाहिजे. वाहतूक, आरोग्य क्षेत्रातील कामं पाहता निवडणूक लागली तर मी राज ठाकरेंशी बोलेन.”

Tags

follow us