पुणे : निलंबित पोलीसअधिकारी रणजीत कासले यांनी काल (दि.16) व्हिडिओ जारी करत आपण पोलिसांना शरण येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, यात त्यांनी शरण कधी आणि कोठे येणा याबद्दल काही माहिती दिली नव्हती. त्यानंतर आता कासले यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर नवा व्हिडिओ शेअर करत आपण पुण्यात पोलिसांना शरण येणार असल्याचे सांगितले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील वाल्मिक कराडदेखील पोलिसांना पुण्यातच शरण आला होता. त्याने देखील शरण येण्यापूर्वी व्हिडिओ जारी केला होता. आता त्याच पद्धतीने कासले यांनीदेखील शरण येण्यापूर्वी व्हिडिओ जारी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
कासलेंच्या नव्या व्हिडिओत काय?
काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती असा दावा निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता कासले यांनी नवीन व्हिडिओ करत माहिती दिली आहे. ज्यात त्यांनी आपण पुण्यात पोलिसांना शरण येणार असून, जीवाला धोका असल्याने पुणे पोलिसांनी बीडला सोडावं अशी मागणी कासले यांनी केली आहे. तसेच माझ्या घराचं कुलूप फोडून पुरावे नष्ट करण्याचा धनंजय मुंडेंच्या माणसांचा प्रयत्न असल्याचा आरोपही कासले यांनी व्हिडिओमध्ये केला आहे. तर, दुसरीकडे याबाबत पुणे पोलिसांचे आणि बीड पोलिसांचे कासलेबाबत काही बोलणे झाले आहे का? याबाबत काही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे जर, कासले पुण्यात शरण आला तर, पुणे पोलिसांची भूमिका काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे खऱ्या अर्थाने आता पुरावे नष्ट करण्यास महाराष्ट्र सरकारनेच सुरूवात केलेली आहे. मी आता थेट महाराष्ट्र सरकारवरचं आरोप करतो असे म्हणत कासले म्हणाले की, बीडमध्ये ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणी स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी राहतात त्यांचा मला व्हॉट्सअपला फोन आला होता. त्यावेळी त्यांनी चार ते पाच माणसं आपल्या घराचं कुलूप तोडून घरात घुसल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर, घराला नवीन कुलूप बसवण्यात आले आहे. शिवाय घरावर एक नोटीसही चिटकवण्यात आली असल्याचे कासले यांनी व्हिडिओत सांगितले आहे.
पुढे कासले म्हणतात की, जर घरावर जर नोटीस चिटकवायची असेल तर माझ्या घराचं लॉक तोडण्याचं कारण काय? असा प्रश्नही कासले यांनी उपस्थित केला आहे. हे सरकार बघा कुठल्या पातळीला जात आहे. करूणा मुंडें यांच्या गाडीत पिस्तुल ठेवलं. आज मला पूर्णपणे शंका आहे की, धनंजय मुंडे यांनीच चार ते पाच लोक त्यांनीच माझ्या घरी पाठवले असून, आता पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू झाले आहे. नवीन पोलीस स्टेशन, नवीन डायऱ्या नवे ऑफिसर हे सर्व करण्यास सुरूवात झाली आहे. या सर्व प्रकरणात आवाज उठवण्यास आपल्याला उशीर झालेला आहे. पुरावे जरी नष्ट झाले तरी आपण ते रिकव्हर करू शकतो असा दावा कासलेंनी केला आहे.
पुणे विमानतळावर येणार
कासले यांनी आपण उद्या पुणे विमानतळावर येणार असून, या ठिकाणी छोटी पत्रकार परिषदे घेणार आहे. त्यानंतरच महाराष्ट्र पोलिसांनी आणि बीड पोलिसांनी अटक करायची आहे. एवढेच नव्हे तर, त्या ठिकाणाहून मला संरक्षणात बीडला न्यावे कारण आता मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.