Video : सुनेत्रा पवारांना ताकद द्या पण, फडणवीस नको; रोहित पवारांचा थेट इशारा

Rohit Pawar पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे आता शहराच्या कायदा-सुव्यवस्थेसोबतच पालकमंत्रिपदावरूनही राजकीय वातावरण तापलं आहे.

Rohit Pawar On Pune Guardian Minister

Rohit Pawar On Pune Guardian Minister

Rohit Pawar On Pune Guardian Minister : पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे आता शहराच्या कायदा-सुव्यवस्थेसोबतच पालकमंत्रिपदावरूनही राजकीय वातावरण तापलं आहे. शिवाजीनगर न्यायालय परिसरात झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याच्या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचं पालकत्व स्वीकारावं, अशी मागणी केली. मात्र, त्यांच्या या मागणीला आमदार रोहित पवार यांनी विरोध केला आहे. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचं पालकत्व घेतलं तर शहराचं वाटोळं होईल,’ असं म्हणत रोहित पवारांनी थेट फडणवीसांवर निशाणा साधला. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनाच अधिक ताकद देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

बाबा ऐकत नाहीत…शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करताच लेक सुप्रियांची पोस्ट

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या होत्या? 

सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त करत अजित पवार पालकमंत्री असताना अशा घटना घडत नव्हत्या, असं म्हटलं होतं. पुण्याची कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः जबाबदारी घ्यावी, अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या या विधानानंतर पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून राजकीय चर्चा सुरू झाली. पुणे शहरात एवढा क्राईम वाढणं हे पुणे शहर नाही तर देशाच्या हिताचं नाही. त्यामुळे माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, एक लोकप्रतिनिधी म्हणून, पुण्याची आणि महाराष्ट्राची नागरिक म्हणून आपण पुण्याची जबाबदारी स्वत: घ्यावी. आपण त्याचं पालकत्व घ्यावं अशी मागणी सुळे यांनी केली होती.

 सुनेत्रा पवारांना ताकद द्या; रोहित पवारांचा आग्रह

रोहित पवार म्हणाले की, अजितदादांचा प्रशासनावर वचक होता. त्यांचा दरारा आणि काम करण्याची पद्धत वेगळी होती. त्यामुळे दादांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. सध्याच्या पालकमंत्र्यांना अजितदादांसारखं काम करता येत नसल्याचंही त्यांनी म्हटलं. सुनेत्रा पवार यांच्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, त्यांची अद्याप सुरुवात आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारांनी आणि खासदारांनी त्यांना मदत केली पाहिजे. पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवारांना अधिक ताकद देण्याची गरज आहे. त्यांना काम करता येत नसेल तर, पुण्याला एखादा कठोर आणि कार्यक्षम पालकमंत्री द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार सध्या पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती.

फडणवीसांनी पुण्याचं पालकत्व घेतलं तर वाटोळं होईल…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे गृहमंत्री आहेत. पुण्यात वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यात गृहखातं अपयशी ठरत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी पुण्याचं पालकत्व स्वीकारण्याची मागणी करणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं. ‘मुख्यमंत्री फडणवीसांनी पुण्याचं पालकत्व घेतलं तर पुण्याचं वाटोळं होईल,’ असा टोला रोहित पवारांनी लगावला. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या मागणीच्या अगदी उलट भूमिका रोहित पवारांनी मांडल्याचं पाहायला मिळत आहे.

पुणे पोलीस आयुक्तांवरही रोहित पवारांचा निशाणा

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस प्रशासनातही बदल करण्याची गरज असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं. पुण्याचे पोलीस आयुक्त कोणाचंही ऐकत नसून केवळ देवेंद्र फडणवीसांचं ऐकतात, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी कार्यक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सुनेत्रा पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस? पालकमंत्रिपदावरून नवा राजकीय पेच

एकीकडे सुप्रिया सुळे यांनी पुण्याचं पालकत्व मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांना अधिक ताकद देण्याची भूमिका घेत फडणवीसांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा आता केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरता मर्यादित राहिलेला नाही. तर पुण्याचं पालकत्व नेमकं कुणाकडे असावं, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला किती ताकद मिळणार आणि मुख्यमंत्र्यांची या प्रकरणातील भूमिका काय असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण, पुण्याच्या पालकमंत्रिपदाबाबत सुप्रिया सुळे यांच्या मागणीच्या अगदी उलट भूमिका रोहित पवारांनी मांडल्याचं पाहायला मिळत असल्याने पवार कुटुंबातच पुण्याच्या पालकमंत्रिपदाबाबत मतभेद आहेत का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

Exit mobile version