सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने माजी (Someshwar) आमदार कै. विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘विनायकी क्रीडा महोत्सव योनेक्स सनराईज सोमेश्वर चषक 2026’ जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून स्पर्धेसाठी एकूण 195 खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा 1 व 2 ऑगस्ट 2026 रोजी द लाईफ स्पोर्ट्स, सोमेश्वरवाडी, पाषाण येथे होणार आहे.
स्पर्धेबाबत माहिती देताना सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, कै. विनायक निम्हण यांच्या क्रीडाप्रेमाची आणि समाजाभिमुख कार्याची प्रेरणा जपण्यासाठी या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बॅडमिंटनसारख्या लोकप्रिय खेळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
50 दिवसांचा विजयी प्रवास! इम्तियाज अलींच्या ‘मैं वापस आऊंगा’ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास
खेळाडूंनी केवळ विजयासाठी नव्हे, तर खेळभावना, शिस्त आणि उत्कृष्ट कामगिरीला प्राधान्य देत स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. भविष्यातही अधिकाधिक खेळाडूंना संधी मिळावी यासाठी सोमेश्वर फाउंडेशन अशा क्रीडा स्पर्धांचे सातत्याने आयोजन करत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्पर्धेचे उद्घाटन द लाईफ स्पोर्ट्स अरेनाचे संस्थापक गणेश निम्हण यांच्या हस्ते होणार आहे. पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत 13, 15, 17 आणि 19 वर्षांखालील मुले-मुलींचे गट, तसेच पुरुष व महिला वरिष्ठ गटातील एकेरी आणि दुहेरी सामने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेते व उपविजेते खेळाडूंना करंडकांसह रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
मानांकनप्राप्त खेळाडू
पुरुष गट : निखिल मराठे, राजू ओव्हाळ, चैतन्य खरात, सौरभ तिवारी.
महिला गट : हर्षिता पाटील, अंजना कल्लापूर.
13 वर्षांखालील मुले : स्ताव्य सिद्धार्थ, कैवल्य मेहेत्रे, चिन्मय गोसावी, अजिंक्य शिंदे.
13 वर्षांखालील मुली : प्रत्यशा दलाई, तेजश्री शेंडे, आराध्या लोहार, अद्विका पाटील.
15 वर्षांखालील मुले : शौर्य वर्मा, अवनीश भालचंद्र, नादाश पालन, अक्षत नायक.
15 वर्षांखालील मुली : तन्वी बोरीकर, मनस्वी राऊत, आदृती चौधरी, प्रत्यशा दलाई.
17 वर्षांखालील मुले : पार्थ सहस्त्रबुद्धे, साकार धाकटे, आरव रवी, प्रशिक तडवळकर.
17 वर्षांखालील मुली : अरुंधती कोंवर, अवनी मुसळे.
19 वर्षांखालील मुले : वत्सल तिवारी, पार्थ सहस्त्रबुद्धे.
