Download App

पोटनिवडणुकीसाठी आमच्याकडं आठ जणांनी.., अजित पवारांनी सांगितली रणनिती

पुणे : पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आमच्याकडे 7 ते 8 जणांनी उमेदवारी मागितल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलंय. आज अजित पवार यांच्या उपस्थितीत अभिनेते प्रभाकर मोरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. यावेळी पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.

पवार म्हणाले, पोटनिवडणुकीसाठी प्रत्येकाला आपापली तयारी करण्याचा अधिकार असून कसबा आणि पिंपरी चिंचवडमधील काही जणांकडून निवडणुकीची तयारी सुरु आहे. या दोन्ही जागांसाठी आत्तापर्यंत आमच्याकडे 7 ते 8 जणांनी उमेदवारी मागितली आहे. यासंदर्भातच कालच माझं आणि उध्दव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करुन आम्ही निर्णय घेणार असल्याचं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलंय.

दरम्यान, मी शुक्रवारी पुण्याला जाणार असून त्यावेळी तेथील कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आता काही लोकांकडून ही निवडणुक अंधेरीसारखी बिनविरोध व्हावी अशी चर्चा केली जातेय. लोकशाहीमध्ये् प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असून कोल्हापूर, नांदेडमधील देगलूरमध्ये पोटनिवडणुका बिनविरोध झालेल्या नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठ मतदारसंघातील मुक्ता टिळक यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अनेक घडामोडी घडल्या आहेत. अखेर या दोन्ही जागांसाठी आता उमेदवारीवरुन पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे.

तर दुसरीकडे भाजपने आमच्या घरातील सदस्याला उमेदवारी देण्याची मागणी टिळक कुटुंबियांकडून करण्यात आलीय. पोटनिवडणुकीसाठी कसब्याची जागा उद्धव ठाकरे गटाला देण्याची मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केली आहे. स्वतः विशाल धनवडे कसब्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांचीही निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे.

दरम्यान, मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलीय. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार तयारी सुरु असून आता ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झालंय.

Tags

follow us