लाखाची मागणी, 35 हजारांत तडजोड; पुण्यात एसीबीने अधिकाऱ्याला रंगेहात पकडले
एसीबीच्या पथकाने पौड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सचिन बाळासाहेब शिंदे यांना 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले.
ACB catches officer red-handed in Pune : पुणे आणि बीड जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या दोन मोठ्या कारवायांमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. दोन्ही ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड येथे ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)च्या पथकाने पौड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सचिन बाळासाहेब शिंदे यांना 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले.
एसीबीचे उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सायंकाळी मुळशी येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रकरणात गाडी जप्त न करण्यासाठी आणि तपासात सहकार्य करण्यासाठी शिंदे यांनी तक्रारदाराकडे 1 लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर 35 हजार रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले.
तरुणीवर अत्याचार अन् व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग; माजी महापौर अभिषेक कळमकरांवर गुन्हा दाखल
त्यानंतर त्यांच्या विरोधात पौड पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातही एसीबीने तत्सम कारवाई करत तहसीलदाराला लाच घेताना अटक केली. बीडच्या परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी शेतकऱ्याकडून सोलंसी (ऐपतीचे) प्रमाणपत्र देण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. यापैकी 20 हजार रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
या सलग कारवायांमुळे पुणे आणि बीड जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरुद्ध एसीबीची कारवाई अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट होत आहे.
