महाराष्ट्र व्यापल्यानंतर चौथ्या दिवशीही (Rain) मॉन्सूनची वाटचाल ठप्प आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत उत्तर अरबी समुद्रातील आणखी काही भाग, गुजरातमधील उर्वरित भाग, मध्य प्रदेशातील काही भाग, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग तसेच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांमध्ये मॉन्सून पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती तयार झाल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. तर मॉन्सूनची सीमा आज सुरत, इंदूर, मंडला, डाल्टनगंज, मोतिहारी या भागातून जात आहे.
तर राज्यात आज वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच मध्य महाराष्ट्र जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून कोकणात मध्यम पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
पुढील काही तासांत जोरदार पाऊस कोसळणार, घराबाहेर जाणं टाळा, हवामान विभागाचा अंदाज काय?
विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा गोंदिया, नागपूर,वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी पावसाचा येलो अलर्ट इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तसंच, मराठवाड्यातील लातूर, बीड, जालना जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.
तर छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असून येलो अलर्टचा इशारा दिला आहे.
तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असून येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
