पुणे महापालिका स्थायी समिती सदस्यांची आज निवड करण्यात आली आहे. (Pune) यामध्ये भाजपकडून १२ नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. भाजपकडून निवड करण्यात आलेल्या १२ सदस्यांची यादी पाहता यामध्ये श्रीनाथ भिमाले यांची स्थायी समिती अध्यक्षपदी वर्णी लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
निवड करण्यात आलेल्या एकूण 16 सदस्यांपैकी भाजपकडून १२ सदस्य तर राष्ट्रवादीचे ३ तर काँग्रेसकडून एक सदस्याची निवड करण्यात आली आहे. भाजपकडून निवड करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये रूपाली धाडवे,कालिंदा पुंडे, जयश्री भुमकर, विशाल धनवडे, सातव रत्नमाला, प्राची आल्हाट, मयुरी कोकाटे, मानवतकर निशा,श्रीनाथ भिमाले, दादा कोद्रे, वृषाली कामठे आणि संदीप बेलदरे यांची निवड करण्यात आली आहे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमोल बालवडकर, वैशाली बनकर, सुहास टिंगरे यांना संधी देण्यात आली असून काँग्रेसकडून माजी महापौर प्रशांत जगताप यांना संधी देण्यात आली आहे.
आता आगामी स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. कुणाची वर्णी लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भाजपकडून एकूण २४ सदस्यांची नावे वरिष्ठांकडे पाठवण्यात आली होती त्यापैकी १२ सदस्यांची आज निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या सदस्यांची नावे पाहता श्रीनाथ भीमाले यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल,अशी चर्चा आहे.
निवडणुकीच्या निकालाआधीच चित्र स्पष्ट; पुणे जिल्ह्यावर पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व
दरम्यान,असे असले तरी भाजपमधील इतर सदस्यही फिल्डिंग लावतांना दिसत आहेत. त्यामुळे भाजप अनुभवी असलेले भीमाले यांना संधी देणार की नवीन चेहऱ्याला संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, असे होण्याची शक्यता फारच कमी आहे. भीमाले हे चौथ्यांदा महापालिकेवर निवडून आले आहेत शिवाय त्यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पर्वती मतदारसंघातून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र पक्षाने त्यांची समजूत काढली होती.
त्यांच्या त्याच संयमाचे फळ म्हणून स्थायीचे अध्यक्षपद देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, स्थायीचे अध्यक्षपद मानाचे पद आहेच मात्र तिजोरीच्या चाव्या आणि आर्थिक सत्ताकेंद्रही असल्याने हे पद मिळवण्यासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मात्र, भिमालेंच पक्षातील वजन पाहता ते बाजी मारतील अशी शक्यता आहे.
