Download App

Kasba by election : ‘टिळक, बिडकर, घाटे यांना टाळून रासने यांनाच भाजपाची उमेदवारी का ? 

Team Letsupp Vishnu Sanap

पुणे : पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा पोटनिवडणूक (Kasba Chinchwad by election) कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यामुळे सर्वच पक्ष निवडणूक तयारीला लागले असून आज (ता.4 जानेवारी) भाजपने कसबा पेठ आणि चिंचवड मधील आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना चिंचवडमधून उमेदवारी दिली. मात्र, कसब्यात टिळक कुटुंबीयांना डावलत भाजपने हेमंत रासने (Hemant Rasane) यांची उमेदवारी घोषित केली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ही पोटनिवडणूक भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर होत असल्याने त्यांच्या कुटुंबातीलच व्यक्तींना तिकीट दिले जाणार, अशी दाट शक्यता होती. चिंचवडमध्ये अपेक्षेप्रमाणे अश्विनी जगताप यांना तिकीट मिळालं. मात्र, कसब्यात भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्र वापरत माजी नगरसेवक हेमंत रासने यांची उमेदवारी घोषित केली. यामुळे कसब्यातून टिळक, बापट कुटुंबीयांना डावलून नेमकं रासने यांनाचं उमेदवारी का दिली गेली ? यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

भाजपकडून कुठलीही निवडणूक असो ती फार गांभीर्याने घेतली जाते, ते आतापर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये आपल्याला वारंवार बघायला मिळाले. यामुळे या निवडणुकीतही भाजपकडून गाफील न राहता काही सर्वे करण्यात आल्याचे बोलले जाते. त्या सर्वेमध्ये टिळक कुटुंबातील कुणाला जर उमेदवारी दिली तर धोका निर्माण होऊ शकतो, असे निकाल आल्याने टिळक कुटुंबाव्यतिरिक्त उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

नेमकी रासनेंनाच उमेदवारी का ? कसबा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद आहे. या मतदारसंघात पाच वेळा भाजपचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी निवडून येण्याचा विक्रम केला आहे. त्यानंतर मुक्ता टिळक यांनी 2019 ची निवडणूक जिंकत भाजपचे वर्चस्व राखलं होतं. मात्र त्यांच्या पश्चात भाजपकडे या मतदारसंघाचा दीर्घकालीन प्रतिनिधित्व करेल, असा चेहरा तयार करणे महत्वाचे आहे. त्यामुळे भाजपचे एकनिष्ठ असलेले व गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते चार वेळेस नगरसेवक म्हणून काम केलेले शिवाय स्थायी समितीचे अनेकदा अध्यक्षपद भूषवलेले रासने यांना पक्षाने संधी दिल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीकडून जर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी निश्चित झाली तर टिळक कुटुंबियांचा टिकाव लागणे मुश्किल होते. कारण या आधी धंगेकर यांनी गिरीश बापट यांना 2009 आणि 2014 च्या निवडणुकीमध्ये घाम फोडला होता. त्यावेळी ते मनसेकडून निवडणूक लढले होते. मात्र, आता काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे) एकत्र असल्याने धंगेकर कडवी टक्कर देणार हे भाजपला ठाऊक आहे. यामुळे या निवडणुकीत जर भाजपला पराभव स्वीकारावा लागला तर आगामी महापालिका निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठी हे भाजपच्या फायद्याचे ठरणार नाही. त्यामुळे भाजपने सावध पवित्रा घेत अनुभवी रासने यांना या निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.

रासनेंची ताकद काय? श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंडळांचे पदाधिकारी म्हणून काम पाहतात, ते ग्राउंड लेव्हलला काम करतात. शिवाय कुठल्या गटा-तटात ते फारशे नसल्याने हेच त्यांच्या पथ्यावर पडल्याचे राजकीय जाणकार सांगतात. दरम्यान, भाजपने रासनेंच्या रूपाने कसब्यामध्ये पत्ता तर टाकलाय, मात्र निवडणूक निकाल काय येतात आणि रासने कसबा राखतात का ? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us