“कुणासाठी कितीबी करा, वेळ आली की फणा काढतातच. पण मी बी पक्का गारुडी आहे. योग्य वेळी सगळी गाणी वाजणार! पुण्याचे मनसेचे (Maharashtra Navnirman Sena) फायर ब्रँड नेते वसंत मोरे (Vasanat More) यांचे अलिकडील काही दिवसांतील हे व्हॉट्सअॅप स्टेटस. या स्टेटसवरुन प्रचंड धुरळा उडाला. मोरे यांनी ते स्टेटस नेमके का ठेवले होते? कोणाला उद्देशून ठेवले होते? वसंत मोरे यांच्याविरोधात नेमका कोणी फना काढला, असे एक ना अनेक सवाल विचारले जाऊ लागले. हा धुरळा खाली बसतोच तोच मोरे यांनी दुसरा स्टेटस ठेवला, “पुणे की पसंत, मोरे वसंत!” पाठोपाठ माध्यमांशी बोलाताना म्हटले, सध्या पाच पाच उमेदवार असताना बाहेरून उमेदवार आयात कशाला करायचा? वसंत मोरे आहे ना इथं. आम्ही काय नुसत्या सतरंज्याच उचलायच्या?
वसंत मोरे हे पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहेत, त्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणीही सुरु केली आहे. ते पुण्याचे खासदार होतील अशा चर्चाही त्यांच्या या विधानांवरुन आणि स्टेटसवरुन सुरु झाली. मात्र या दोन्ही स्टेटसच्यामध्येच एक विधान कमालीचे चर्चेत आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात बोलताना साईनाथ बाबारांना मोठी संधी देण्याबद्दल वक्तव्य केले. आता साईनाथ बाबर म्हणजे कोण तर एकेकाळचे वसंत मोरे यांचे जवळचे सहकारी आणि आताचे कडवे प्रतिस्पर्धी. शर्मिला ठाकरे यांच्या या विधानामुळे आता मोरे यांचे तिकीट कापले जाणार आहे का? वसंत मोरे यांनी ते फणा काढण्याचे आणि गारुडी असण्याचे स्टेटस ठाकरे यांच्या विधानावरुनच ठेवले होते का? वसंत मोरे हे बाबर यांना लोकसभेच्या पटावर चेकमेट करु पाहत आहेत का? की बाबर यांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन मोरे यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे नियोजन केले जात आहे? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
पुण्यात सगळ्या पक्षाकडून लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झालेली पाहायला मिळत आहे. त्यातच आता मनसे सुद्धा तयारी लागल्याचे दिसत आहे. वसंत मोरे यांच्याकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संपर्क ठेवणे, जनता दरबार घेणे यामुळे वसंत मोरे हे सतत चर्चेत असतात. मात्र वसंत मोरे यांना सर्वात मोठे आव्हान आहे ते साईनाथ बाबर यांचे. खरं सांगायचं तर साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांच्या पुणे लोकसभा निवडणुकीवरून मागच्या काही काळापासून रोजची रस्सीखेच सुरू आहे. पुण्यात मनसेचे दोन गट पडल्याचे स्पष्ट नसले तरी त्यांचे वाद कायमसमोर आले आहेत.
राज ठाकरे यांच्या गळ्यातील ताईत असणारे, त्यांच्या एका इशाऱ्यावर अॅक्शन मोडमध्ये येणारे वसंत मोरे काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्यापासून दुरावल्याची चर्चा आहे. मध्यंतरी राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे बंद करण्याची भूमिका घेतली होती, त्या भुमिकेला वसंत मोरे यांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले होते आणि बाबर यांना शहराध्यक्ष दिले गेले.मोरे ठाकरेंपासून दुरावले तर बाबर जवळ गेले. तेव्हापासून वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्या दोस्तीत कुस्ती सुरू असल्याचे दिसून आले आहे. मनसेच्या अनेक कार्यक्रमात देखील हे चित्र बघायला मिळाले. त्यामुळेच मग वसंत मोरे मनसे सोडणार अशा चर्चांना देखील होत असतात.
वसंत मोरे हे सुरुवातीपासूनच राज ठाकरे यांच्यासोबत राजकारणात वर गेले. त्यांनी शिवसेनेतून राजकारणाला सुरुवात केली पण राज ठाकरे यांच्यासोबतच. 2007 साली राज ठाकरे यांच्यासोबत ते मनसैनिकही झाले. त्यानंतर 2007 साली झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे आठ नगरसेवक निवडून आले. वसंत मोरे त्यापैकीच एक. तिथूनच राज ठाकरेंचा आदेश आला की वसंत लगेच ॲक्शन मोडमध्ये येणार हे ठरलेलं गणित आहे. 2012 च्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे 27 नगरसेवक निवडून आल्यानंतर मोरे यांची सभागृहात विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती.
या दोन्ही संधींचे सोने करत मोरे यांनी पुण्यात आपली ताकद कमालीची वाढवली. नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न उचलून धरणे, रस्ता, पाणी अशा विषयांवर भांडायलाही मागे पुढे न बघणे, फायनान्स कंपन्यांच्या मनमानी कारभाराचा जाब विचारणे, कष्टकरी गरिबांचे पैसे बुडवणाऱ्या ठेकेदार किंवा व्यावसायिकाला झापणे, दवाखान्यातील बिलांमध्ये फेरफार करणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनाला धारेवर धरणे, शासकीय योजनांचा फायदा लोकांना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे, अडला नडल्या प्रत्येक माणसाला त्याची जात, धर्म, राज्य न बघता मदत करणे या आणि अशा बऱ्याच कामात वसंत मोरे मागील पंधरा वर्षांपासून सक्रिय आहेत.
वसंत मोरे यांची कार्य करण्याची डॅशिंग पद्धत बघून अनेकांना असं वाटतं की ते प्रसिद्धीसाठी राजकीय स्टंट करतात, पण कात्रज आणि आसपासच्या भागातील वसंत मोरांच्या कामाचे मनापासून कौतुक करताना दिसतात. त्यामुळेच सलग दोन वेळा बेस्ट नगरसेवकाचा पुरस्कार सुद्धा वसंत मोरे यांच्या नावावर आहे. आपल्या राजकीय पक्षाकडून किंवा त्यातील वरिष्ठ नेत्यांकडून एखादी चुकीची गोष्ट होत असेल तर त्या संदर्भातही मोरे ठाम भूमिका घेतात. त्यातूनच त्यांनी आपल्या मतदारसंघात साडे तीन लाख मुस्लीम बांधव गुण्यागोविंदाने राहातात असे म्हणत थेट राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यांच्या भुमिकेलाही विरोध केला होता.
त्या भूमिकेनंतर मनसेने त्यांना शहराध्यक्ष पदावरून दूर केले, त्यानंतर त्यांचा शहरातील मनसेच्या इतर नेत्यांशी संभाषणही नव्हतं. त्यामुळे ते राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत जाणार या चर्चांना सुरुवात झाली. मात्र काही दिवसांनी राज ठाकरे यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत वसंत मोरे यांनी आपण मनसे पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचे जाहीर केले. पुण्याच्या कात्रज चौकात वसंत मोरे यांच्या सौजन्याने राज ठाकरे यांचे भित्तीचित्र रेखाटण्यात आले आहे. यातून मोरे यांची राज ठाकरे आणि मनसेसोबत असलेली बांधीलकी दिसून येते.
मात्र त्यानंतरही वसंत मोरेना इतर पक्षातून ऑफर येतच राहिल्या. राष्ट्रवादीतर्फे अजित पवार त्यांना म्हणाले होते की “मोरे कधी येताय वाट पाहतोय. शिवसेनेचे नेते संजय राऊत पुण्यातील एका कार्यक्रमात मोरे यांना म्हणाले होते “चांगलं काम करताय, पुन्हा नक्की भेटू.” उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तेही म्हणाले होते की, “वसंत मोरे आमच्याकडे येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे.” एकूणच काय वसंत मोरे सर्वपक्षांशी संपर्क ठेवून आहेत आणि आपली बार्गिनींग पॉवर बाळगून आहेत. मात्र साईनाथ बाबर यांचेही आव्हान त्यांना आहेच. बाबर यांची मोरे यांच्याएवढी क्रेझ नसली तरीही ते मनसे आणि राज ठाकरे यांचे कट्टर आणि कडवट मनसैनिक म्हणून ओळखले जातात. शहरात ते आपली चांगली ताकद बाळगून आहेत.
वसंत मोरे यांनी यापूर्वी मनसेच्या तिकिटावर 2009 आणि 2019 साली हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा त्यात पराभव झाला होता. साधारण 35000 च्या आसपास त्यांना मतदान झाले होते.2014 मध्ये ते खडकवासला मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र राज ठाकरे यांनी त्यांना तिकीट नाकारले. पराभव आणि तिकीट नाकारले तरी मोरे शांत बसले नाहीत. ते काम करत राहिले. त्यामुळेच आता 2024 च्या लोकसभेसाठी पुणे मतदार संघातून वसंत मोरे यांनी स्वतःची दावेदारी सांगायला सुरुवात केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भावी खासदार म्हणून शेकडो फ्लेक्स लागले होते. यावर बोलताना वसंत मोरे म्हणाले की, “पुण्याने ठरवलं तर ते मनसेचा पहिला खासदार संसदेत नक्कीच पाठवू शकतात.”
पण वसंत मोरे यांची राजकीय ताकद असली तरी ती कात्रज, खडकवासला आणि हडपसर या भागापुरती मर्यादित आहे. पण पुणे लोकसभेचा विचार करता मागील काही वर्षांपासून तिथे भाजपचे वर्चस्व आहे. सुरेश कलमाडे यांची संद्दी संपवल्यानंतर भाजपने या ठिकाणी मजबूत पाय रोवले आहेत. त्यानंतर काँग्रेसला म्हणावा असा तगडा उमेदवार या ठिकाणी मिळाला नाही. आताही भाजपकडून मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. अशात जर मनसेला आपला खासदार निवडून द्यायचा असले तर मोरे किंवा बाबर यांच्यातील निर्णय लवकरात लवकर घेण्याची गरज आहे. अन्यथा दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी अवस्था होण्याची दाट शक्यता आहे.