Download App

Asia Cup 2025 : पाकिस्तानचा बांगलादेशवर 11 धावांनी विजय, फायनलमध्ये भारताविरुद्ध हाय-व्होल्टेज सामना

आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर-4 फेरीच्या पाचव्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर 11 धावांनी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

  • Written By: Last Updated:

Asia Cup 2025 Pakistan beats Bangladesh : आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर-4 फेरीच्या पाचव्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर 11 धावांनी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 8 गडी गमावून 135 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशचा संघ 20 षटकांत 9 बाद 124 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

‘हाय-व्होल्टेज’ सामना रंगणार

पाकिस्तानच्या गोलंदाजांनी शेवटपर्यंत अचूक मारा (Asia Cup 2025) करत बांगलादेशला (Bangladesh) लक्ष्य गाठू दिले नाही. या विजयामुळे पाकिस्तानने फायनलमध्ये धडक दिली असून, 28 सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध आशिया कप ट्रॉफीसाठी ‘हाय-व्होल्टेज’ सामना (Ind Vs Pak) रंगणार आहे.

पाकिस्तानची फलंदाजी

टॉस जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून मोहम्मद हारीसने सर्वाधिक 31 धावा केल्या. मोहम्मद नवाझने 25, तर कर्णधार सलमान आघा आणि शाहीन आफ्रिदी यांनी प्रत्येकी 19 धावा केल्या. इतरांनी लहानमोठं योगदान देत संघाला 135 धावांपर्यंत मजल मारून दिली.
गोलंदाजी करताना बांगलादेशच्या तास्किन अहमदने 3 विकेट्स घेतल्या. मेहदी हसन आणि रिशाद हुसैन यांनी प्रत्येकी 2, तर मुस्तफिजुर रहमानने 1 बळी घेतला.

बांगलादेशचा डाव डळमळीत

136 धावांचं साधं लक्ष्य समोर असूनही बांगलादेशचा डाव डळमळीत ठरला. शमीम हुसैनने सर्वाधिक 30 धावा केल्या. सैफ हसनने 18, नुरुल हसन व रिशाद हुसैन यांनी प्रत्येकी 16, तर मेहदी हसनने 11 आणि तंझीम साकिबने 10 धावा जोडल्या. मात्र उर्वरित फलंदाज पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर झुके.
पाकिस्तानसाठी शाहीन आफ्रिदी आणि हरीस रौफ हे प्रमुख गोलंदाज ठरले. दोघांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. सॅम अयूबने 2 गडी बाद केले, तर मोहम्मद नवाझने 1 विकेट मिळवली.

अंतिम फेरी भारत-पाकिस्तानची

या विजयामुळे पाकिस्तान थेट फायनलमध्ये दाखल झाला असून, भारतासोबत तिसऱ्यांदा या स्पर्धेत आमनेसामने भिडणार आहे. गटसाखळी आणि सुपर-4 फेरीत भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात पाकिस्तान पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे टीम इंडिया आपला दबदबा कायम ठेवून सलग दुसऱ्यांदा आशियाई विजेतेपद पटकावण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

follow us