Download App

टेनिस-स्क्वॉशमध्ये गोल्ड, हॉकीमध्ये पाकिस्तानचा धुव्वा; आशियाई क्रीडा स्पर्धेत सातवा दिवस भारताचा

Asian Games 2023: चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारताने पहिल्या 6 दिवसांत एकूण 33 पदके जिंकली होती. या आशियाई क्रीडा स्पर्धेचा सातवा दिवस भारतासाठी खूप ऐतिहासिक ठरला. टेनिसच्या (Tennis) मिश्र दुहेरीत भारताने सुवर्णपदक जिंकले, तर स्क्वॉश (Squash) संघाने सुवर्णपदकाच्या लढतीत पाकिस्तानविरुद्ध रोमहर्षक विजयाची नोंद केली. भारताने सातव्या दिवशी एकूण 5 पदके जिंकली, त्यानंतर आता एकूण पदकांची संख्या 42 वर पोहोचली आहे. यामध्ये 11 सुवर्ण व्यतिरिक्त 16 रौप्य आणि 15 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत सध्या चौथ्या स्थानावर आहे.

नेमबाजी स्पर्धांमध्ये भारताची सर्वोत्तम कामगिरी या आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत दिसून आली आणि सातव्या दिवशीही ती कायम राहिली. नेमबाजीच्या मिश्र प्रकारात भारताला रौप्य पदक जिंकण्यात यश आले, यामध्ये सरबजोत आणि दिव्याच्या जोडीने बाजी मारली.

भारताने टेनिसमधील आजचे दुसरे पदक गोल्डच्या रूपाने जिंकले. मिश्र दुहेरीत रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले या जोडीने सुपर टायब्रेक सामन्यात 10-4 असा विजय मिळवून सुवर्णपदक जिंकले. 2002 नंतर प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

स्क्वॉशनंतर हॉकीमध्येही पाकिस्तानला धूळ चारली, भारतीय टीमचे शानदार प्रदर्शन

आज तमाम चाहत्यांच्या नजरा स्क्वॉशच्या सुवर्णपदकाच्या सामन्यावर खिळल्या होत्या, ज्यात पाकिस्तानशी स्पर्धा होती. या सामन्यातील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र यानंतर सौरव घोषालने विजय मिळवत भारताला 1-1 अशी बरोबरी आणली आणि त्यानंतर अभय सिंगने आपला सामना जिंकून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

World Cup 2023: भारत-इंग्लंड सामन्यात ‘पावसा’चा सराव, खेळाडू पव्हेलियनमध्येच

अॅथलेटिक्समध्ये भारताने आज एकाच स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदक पटकावले. पुरुषांच्या 10 हजार मीटर शर्यतीत भारताच्या कार्तिक कुमारने रौप्यपदक तर गुलवीरने कांस्यपदक जिंकले.

चीनला सर्वाधिक पदके

ही स्पर्धा चीनमध्ये होत आहे. चीनने सर्वाधिक 228 पदके जिंकली आहेत. त्यात 120 सुवर्ण, 71 रौप्य, 37 कांस्यपदके जिंकली आहेत. दक्षिण कोरिया पदक मिळविण्यात दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण कोरियाने 30 सुवर्ण, 32 रौप्य, 58 कांस्यपदके जिंकली आहे. तर जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे. जपानने 29 सुवर्णपदके जिंकली आहे. तर 38 रौप्य आणि 39 कांस्यपदके जिंकली आहेत.

Tags

follow us