Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (Asian Games 2026) मध्ये भारताची मोहीम शनिवारी अखेर संपली. आयची-नागोया येथे झालेल्या या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदके जिंकली. यामध्ये 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्यपदकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताने दमदार कामगिरी करत पदकांची संख्या वाढवली आहे. भारत या स्पर्धेत पदकांच्या बाबतीत चौथ्या स्थानावर राहिला आहे.
‘हिटलरने स्वतःला गोळी घातली’; तशी वेळ येऊ नये, भाजपने लक्षात ठेवावं, उद्धव ठाकरेंचा इशारा
शनिवार भारतासाठी शेवटचा दिवस विशेष ठरला आहे. अमन सेहरावतने पुरुषांच्या फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये, भारतीय पुरुष क्रिकेट संघाने आणि पुरुष हॉकी संघाने सुवर्णपदक पटकावले. कुस्तीपटू अंतिम पंघालने रौप्यपदक, तर दीपक पुनियाने कांस्यपदक जिंकले आहे. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष क्रिकेट आणि पुरुष हॉकी या दोन्ही खेळांतील आपली विजेतेपदाची कामगिरी कायम ठेवली. क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 19 धावांनी पराभव केला. तर पुरुष हॉकी संघाने अंतिम सामन्यात मलेशियाचा 5-1 असा दणदणीत पराभव करत सुवर्णपदकावर पुन्हा कब्जा केला आहे.
पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानी
स्पर्धेच्या अखेरीस भारताने पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. उझबेकिस्ताननेही 21 सुवर्णपदके जिंकली होती. मात्र भारताच्या खात्यात रौप्यपदकांची संख्या अधिक असल्याने भारताने उझबेकिस्तानला मागे टाकत चौथे स्थान मिळवले. पदकतालिकेत चीन पहिल्या, जपान दुसऱ्या आणि दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर राहिला.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची दुसरी सर्वोत्तम कामगिरी
भारताने 2026 च्या स्पर्धेत जिंकलेली 85 पदके ही आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची दुसरी सर्वोत्तम पदकसंख्या ठरली आहे. यापूर्वी 2023 मध्ये हांगझोऊ येथे भारताने विक्रमी 106 पदके जिंकली होती. त्याचप्रमाणे, 2026 मधील 21 सुवर्णपदके हीदेखील एका स्पर्धेतील भारताची दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताचे चौथे स्थान हे 2023 च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतील चौथ्या स्थानाइतकेच आहे. तसेच 1962 नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे संयुक्त सर्वोत्तम स्थान ठरले आहे.
