ऑस्ट्रेलियाने पराभवाचा वचपा काढला; बांगलादेशविरुद्धची दुसरी कसोटी दोन दिवसांत जिंकली

AUS vs BAN 2nd Test: कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच बांगलादेशचा संघ एका कसोटी सामन्यात दोन्ही डावांत 100 धावांचा टप्पा गाठू शकला नाही.

Aus Beat Bangladesh

Aus Beat Bangladesh

AUS vs BAN 2nd Test : पहिल्या कसोटीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा (Australia) बांगलादेशने (Bangladesh) पराभव केला आहे. या पराभवाचा बदला दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने घेतला आहे. दुसरा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांत संपला. या सामन्यात केवळ 125 षटकांचा खेळ झाला आहे. ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा डाव आणि 51 धावांनी पराभव केला. या विजयासह दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटलीय.

पहिल्या डावात अवघ्या 64 धावांत सर्वबाद झाल्यानंतर बांगलादेशचा दुसरा डावही 95 धावांत गुंडाळला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच बांगलादेशचा संघ एका कसोटी सामन्यात दोन्ही डावांत 100 धावांचा टप्पा गाठू शकला नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 210 धावा केल्या होत्या. मकाय येथे पहिल्या दिवशी 18 फलंदाज बाद झाले, तर दुसऱ्या दिवशी अवघ्या दोन सत्रांत 12 विकेट पडल्या. त्यामुळे सामना केवळ 125 षटकांतच संपला. तब्बल 23 वर्षांनंतर बांगलादेशचा संघ कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला होता.


दिग्दर्शक स्वरूप सावंत यांच्या बहुचर्चित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या मराठी चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित

बांगलादेशची फलंदाजी पुन्हा अपयशी
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने दुसऱ्या डावातही बांगलादेशला सुरुवातीलाच धक्के दिले. त्याने आपल्या दुसऱ्या षटकातील सलग दोन चेंडूंवर शदमन इस्लाम आणि मोमिनुल हक यांना बाद केले. यानंतर पॅट कमिन्सने तंजीद हसन तमीमची विकेट घेतली. अवघ्या 24 धावांवर बांगलादेशचे तीन फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर कर्णधार नजमुल हुसैन शांतो आणि मुशफिकुर रहीम यांनी 27 धावांची भागीदारी केली. मात्र, नॅथन लायनने शांतोला बाद करत ही भागीदारी मोडली आणि त्यानंतर पुन्हा विकेट्सची मालिका सुरू झाली. दुसऱ्या दिवशी टी-ब्रेकनंतर लगेचच बांगलादेशचा डाव संपुष्टात आला. मुशफिकुर रहीम 29 धावांवर नाबाद राहिला, तर कर्णधार शांतोने 31 धावांची सर्वाधिक खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 4 विकेट, तर पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. कमिन्सने आपल्या 10 षटकांत केवळ 10 धावा दिल्या.

मिचेल स्टार्कचा 10 विकेट्सचा पराक्रम
ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो मिचेल स्टार्क ठरला. पहिल्या डावात त्याने अवघ्या 12 धावा देत 6 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे, केवळ 22 चेंडूंमध्ये त्याने 5 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. दुसऱ्या डावात स्टार्कने आणखी 4 फलंदाजांना बाद केले. अशाप्रकारे त्याने संपूर्ण सामन्यात 51 धावा देत 10 विकेट्स घेतल्या. एका कसोटी सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याची ही स्टार्कची चौथी वेळ आहे. हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील एका सामन्यातील दुसरा सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम ठरलाय.

शोरिफुल इस्लामचीही शानदार गोलंदाजी
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज शोरिफुल इस्लाम याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाला मोठा धक्का दिला. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा डाव 210 धावांवर संपला. शोरिफुलने 48 धावा देत 7 विकेट्स घेतल्या. कसोटीच्या एका डावात 7 विकेट घेणारा तो बांगलादेशचा पहिला वेगवान गोलंदाज ठरला. बांगलादेशच्या कोणत्याही वेगवान गोलंदाजाची कसोटीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक 67 धावांची खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 210 धावांची मजल मारली आणि अखेर बांगलादेशवर डावाने विजय मिळवला.

Exit mobile version