‘कांगारू’ दमले, घाम निघला पण बांगलादेश वाघ ‘हसन’ हटला नाही; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीवर बांगलादेशची मजबूत पकड

Tanzid Hasan: तंझिदने 197 चेंडूंत 101 धावा केल्या. त्यात त्याने आठ चौकार आणि एक षटकार मारला.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Tanzid Hasan

AUS vs BAN 1st Test Match : आपल्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज ‘वाघ’ असतात. वेगवान गोलंदाज पाहुण्यांना अक्षरश: सळो की पळो करून सोडतात. कसोटी सामना असेल तर ते आणखी आक्रमक होतात. पण आता उलटे घडले आहे. या कांगारूंची शिकार बांगलादेशी वाघांनी सहज केलीय. बांगलादेशी फलंदाजांसमोर कांगारू गोलंदाज दमले होते. तंजिद हसनने (Tanzid Hasan) शतकी खेळी करत बांगलादेशला पहिल्या डावात 153 धावांची आघाडी मिळून दिली असून, अजूनही या संघाचे चार फलंदाजी बाकी आहेत. पहिल्या कसोटीतील दोन दिवस बांगलादेशने आपल्या नावावर केलेत.

बांगलादेशने दुसरा दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात 6 बाद 351 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला अवघ्या 198 धावांत गुंडाळले होते. त्यानंतर बांगलादेशने आता 153 धावांची मजबूत आघाडी घेतले.

तंझिद हसनचे ऐतिहासिक शतक
गोलंदाजीत हसन महमूदने केलेल्या शानदार कामगिरीनंतर फलंदाजीत तंझिद हसनने चमक दाखवली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शतक झळकावत इतिहास रचला. ऑस्ट्रेलियात कसोटी शतक करणारा तो बांगलादेशचा पहिला फलंदाज ठरला आहे. बांगलादेशने दुसऱ्या दिवसाची सुरुवात 1 बाद 96 धावांपासून केली. तंझिद हसन 32 तर मोमिनुल हक 35 धावांवरून पुढे खेळायला आला. हकने आपल्या धावसंख्येत आणखी 14 धावांची भर घातली. परंतु तो 49 धावांवर बाद झाला आहे. अवघ्या एका धावेने त्याचे अर्धशतक हुकले. त्यानंतर कर्णधार नजमुल हुसैन शांतोने तंझिदला चांगली साथ दिली. दोघांनी मिळून 93 धावांची भागीदारी केली. दरम्यान तंझिदने आपले शतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर लगेचच तो बाद झाला.तंझिदने 197 चेंडूंत 101 धावा केल्या. त्यात त्याने आठ चौकार आणि एक षटकार मारला. शांतोही शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता; मात्र जोश हेजलवूडने 84 धावांवर त्याचा डाव संपवला. शांतोने 128 चेंडूंचा सामना करताना सात चौकार आणि एक षटकार लगावला.

मिराजने सावरला बांगलादेशचा डाव
दोन महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर बांगलादेशचा डाव कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यात अनुभवी फलंदाज लिटन दासही खाते न उघडताच बाद झाला. त्यामुळे बांगलादेशची चिंता वाढली होती. मात्र मेहदी हसन मिराज आणि हसन महमूद यांनी संयमी फलंदाजी करत दिवसअखेर संघाला आणखी धक्का बसू दिला नाही. मिराज 73 चेंडूंत 3 चौकारांसह 32 धावांवर नाबाद आहे, तर हसन महमूद १३ धावांवर नाबाद आहे.ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांच्या खात्यात प्रत्येकी एक विकेट जमा झाली आहे.

follow us