फाइव्ह स्टारची सवय, एशियन गेम्समध्ये 3 आणि 4-स्टार हॉटेल; टीम इंडियाच्या मुक्कामाबाबत BCCI घेणार मोठा निर्णय

भारतीय क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या फाइव्ह स्टार सुविधांच्या तुलनेत हॉटेल्स कमी दर्जाची असल्याने बीसीसीआय स्वतंत्र व्यवस्था करण्याचा विचार करत आहे.

Untitled Design   2026 09 05T151611.795

Untitled Design 2026 09 05T151611.795

BCCI to take a major decision : आयची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघाच्या निवास व्यवस्थेवरून बीसीसीआयसमोर पेच निर्माण झाला आहे. आयोजकांनी दोन्ही संघांसाठी हॉटेल्स निश्चित केली आहेत. मात्र भारतीय क्रिकेटपटूंना नेहमी मिळणाऱ्या फाइव्ह स्टार सुविधांच्या तुलनेत ही हॉटेल्स कमी दर्जाची असल्याने बीसीसीआय स्वतंत्र निवास व्यवस्था करण्याचा विचार करत आहे. तसं झाल्यास हॉटेल, जेवण, वाहतूक आणि खेळाडूंना वेळेत मैदानावर पोहोचवण्याची संपूर्ण जबाबदारी बीसीसीआयलाच घ्यावी लागणार आहे.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (IOA) सीईओ रघुराम अय्यर यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली. आयोजकांची व्यवस्था बीसीसीआयला योग्य वाटत नसेल तर बोर्ड स्वतंत्र व्यवस्था करू शकतो. मात्र क्रिकेट संघासाठी आयओए स्वतंत्र हॉटेलची मागणी करणार नाही. बीसीसीआय आणि आयोजन समितीने त्यावर तोडगा काढावा, असं त्यांनी सांगितलं. सध्या भारतीय पुरुष संघासाठी थ्री-स्टार एपीए हॉटेल नागोया एकीमाई’, तर महिला संघासाठी फोर-स्टार माईतेत्सु ग्रँड हॉटेल निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात झिरवळांचे ओएसडी संशयाच्या भोवऱ्यात; गणेश देवरेंनी केला मोठा खुलासा

दोन्ही ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध असल्या तरी त्या क्रिकेटपटूंना नेहमी मिळणाऱ्या फाइव्ह स्टार हॉटेल्सच्या तुलनेत कमी दर्जाच्या आहेत. त्यात खेळाडूंना एका खोलीत दोघांनी राहण्याची ‘ट्विन शेअरिंग’ व्यवस्था असल्याचाही मुद्दा आहे. BCCIचे सीईओ  हेमांग अमीन यांनी IOAशी याबाबत चर्चा केली आहे. बोर्डाची अ‍ॅडव्हान्स टीम जपानला जाऊन हॉटेल्स, क्रिकेट मैदान आणि इतर सुविधांची पाहणी करणार आहे. त्यानंतर आयोजकांची व्यवस्था स्वीकारायची की स्वतंत्र हॉटेल घ्यायचं, याचा अंतिम निर्णय बीसीसीआय घेईल.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला संघ 14 सप्टेंबरला नागोयासाठी रवाना होणार असून 18 सप्टेंबरपासून थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळेल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पुरुष संघ 21 सप्टेंबरला जपानला रवाना होईल आणि 28 सप्टेंबरपासून त्याचं अभियान सुरू होईल. बीसीसीआयने स्वतंत्र हॉटेल निवडल्यास खोल्या, जेवण, स्थानिक वाहतूक आणि मैदानापर्यंतच्या प्रवासाची संपूर्ण व्यवस्था बोर्डाला करावी लागेल. त्याचबरोबर स्पर्धेचे सुरक्षा, मान्यता आणि प्रवेशाचे नियम लागू राहतील. वाडा आणि इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकाऱ्यांनाही खेळाडू कुठे वास्तव्यास आहेत याची माहिती द्यावी लागेल, जेणेकरून अचानक डोपिंग चाचणी करता येईल.

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारत आणि जपानच्या पुरुष संघांमध्ये 22 सप्टेंबरला सुझुकी कप अंतर्गत टी-20 सामना होणार आहे. आशियाई स्पर्धेपूर्वी भारतीय संघासाठी हा सामना महत्त्वाची मॅच प्रॅक्टिस ठरू शकतो.

Exit mobile version