AUS vs SL : ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाला आहे. चौथ्या दिवशी श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला फक्त 75 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने फक्त एक विकेट गमावत दणदणीत विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तब्बल 14 वर्षांनंतर श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकली आहे. पहिल्या सामन्यातही श्रीलंकेचा तब्बल 242 धावांनी लाजिरवाणा पराभव झाला होता.
याआधी ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेत 2011 मध्ये कसोटी मालिका जिंकली होती. या तीन सामन्यांच्या मालिकेत कांगारू संघाने 1-0 अशा फरकाने मालिका जिंकली होती. यानंतर पुन्हा 14 वर्षांनंतर असाच कारनामा ऑस्ट्रेलियाने केला आहे. 2022 मध्येही मालिका झाली होती पण ही मालिका 1-1 अशी अनिर्णित राहिली होती. आता मात्र ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत दोन सामने जिंकून मालिकाविजयही साकारला आहे.
IND vs AUS: शेवटच्या तासाभरात भारताने गमावल्या ७ विकेट्स; कसोटीत ऑस्ट्रेलियाने मारली बाजी
या सामन्यातील पहिल्या डावात श्रीलंकेने 257 धावा केल्या होत्या. यानंतर स्टीव्ह स्मिथ 131 आणि अॅलेक्स केरीने 156 धावा करत 259 धावांची शानदार भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 414 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 157 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजने 76 तर कुसल मेंडिसने 50 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त अन्य फलंदाज फार काही करू शकले नाहीत. त्यामुळे श्रीलंकेचा संघ फक्त 231 धावांवर ऑळ आऊट झाला. लियोन आणि कुहनेमॅन या दोघांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या. या दोघांनी पहिल्या डावातही तीन तीन विकेट्स घेतल्या होत्या.