Gautam Gambhir : नवीन वर्षातील कालचा पहिलाच दिवस भारतीय क्रिकेटमध्ये (Team India) भूकंप घेऊन आला. टीम इंडियातील मोठी धुसफूस समोर आली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना भारतीय संघाची कमगिरी अतिशय (IND vs AUS Test Series) निराशाजनक राहिली. त्यामुळे अंतर्गत द्वंद्व सुरू झालं आहे. मेलबर्न कसोटीत लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) संघातील खेळाडूंवर प्रचंड संतापल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता आणखी एक मोठा दावा केला जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या (BCCI) हवाल्याने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की जर भारतीय संघाच्या कमगिरीत सुधारणा झाली नाही तर गौतम गंभीरवर कारवाई होऊ शकते.
ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 184 धावांनी पराभव झाला. या सामन्यात गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली पण फलंदाजांनी प्रचंड निराश केले. फलंदाजांनी जिंकता येणारा सामना गमावला. त्यानंतर प्रचंड संतापलेल्या गौतम गंभीरने सर्व संघालाच धारेवर धरले. आता खेळाडूंना त्यांच्या मनाप्रमाणे वागता येणार नाही असे स्पष्ट बजावले. ड्रेसिंग रूममध्ये कर्णधार पदावरून मतभेद झाल्याचाही दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला.
आता एक नव्या रिपोर्टनुसार गंभीरवरच कारवाई होण्याची शक्यता आहे. पीटीआय न्यूज एजन्सीने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की गंभीरकडे आता फक्त चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंतचा वेळ (Champions Trophy 2025) आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने दावा करण्यात आला आहे की सिडनी कसोटीनंतर भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायची आहे. अशा परिस्थितीत जर गंभीरच्या कामगिरीत सुधारणा दिसली नाही तर त्याचे प्रशिक्षकपद धोक्यात येईल.
“आता बस झालं..” टीम इंडियाच्या पराभवानंतर गंभीर संतापला; खेळाडूंना सुनावले खडेबोल
बोर्डाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी अजून कोणताही थेट निर्णय घेतलेला नाही. जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बीसीसीआयच्या सचिवपदी फक्त एक अंतरिम सचिव काम पाहत आहे. लवकरच बोर्डाला स्थायी सचिव मिळेल असे सांगण्यात येत आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जर टीम इंडियाची कामगिरी सुधारली नाही तर गंभीरचे अधिकार नक्कीच कमी होतील. चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात 19 फेब्रुवारीपासून होणार आहे आणि ही टुर्नामेंट 9 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजेच 1 जानेवारी ते 9 मार्चपर्यंत असे एकूण 68 दिवस गंभीरच्या हातात आहेत. या काळात त्याला भारतीय संघाच्या कामगिरीत सुधारणा करून दाखवावी लागणार आहे.
गंभीर आणि संघातील खेळाडूंचे एकमत नाही. अंतर्गत धुसफूस आहे हे अनेकदा समोर आलं आहे. संघातील काही अनुभवी खेळाडूंचा गंभीरवर विश्वास नाही असेही सांगितले जात आहे. रवी शास्त्री आणि राहुल द्रविड यांच्या कार्यकाळात ज्या पद्धतीने खेळाडूंना स्पष्ट संदेश मिळत होते त्या पद्धतीने गंभीरच्या कार्यकाळात होत नाही. टीम किंवा प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळाडू निवडीच्या मुद्द्यावर कर्णधार रोहित शर्मा खेळाडूंशी स्पष्ट (Rohit Sharma) बोलू शकत नसल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
संघातील काही खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे कारण गंभीर प्लेइंग इलेव्हनमध्ये सातत्याने नवीन प्रयोग करत आहे. यामुळे अनेक बदल होत आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर शुभमन गिलला चौथ्या सामन्यातून अचानक वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय कुणालाच पटलेला नव्हता असे सांगण्यात आले. यानंतर आता गौतम गंभीर खरंच संघाच्या कामगिरीत सुधारणा करून दाखवणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.