Download App

..तर सात दिवस खेळाडूला मैदानात NO ENTRY; क्रिकेटच्या नियमांत ICC कडून मोठा बदल

एखाद्या खेळाडूला सामन्या दरम्यान कनकशनमुळे सब्स्टिट्यूट केले तर दुखापतग्रस्त खेळाडू सात दिवस मैदानात येऊ शकणार नाही.

ICC Changes Rules : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने क्रिकेटच्या (ICC Changes Rules) नियमांत काही महत्वाचे बदल केले आहेत. 17 जूनपासून सुरू झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship) नव्या सायकलबरोबरच काही नियम लागू करण्यात आले आहेत. कॅच, स्टॉप क्लॉक आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन चेंडूंचा वापर यांसारख्या नियमांची चर्चा होत आहे. कनकशनशी संबंधित नियमात एक मोठा बदल झाला आहे. ज्यामुळे खेळाडू सात दिवसांपर्यंत क्रिकेट खेळू शकणार नाही. जर एखाद्या खेळाडूला सामन्या दरम्यान कनकशनमुळे सब्स्टिट्यूट केले तर दुखापतग्रस्त खेळाडू कमीत कमी सात दिवस मैदानात येऊ शकणार नाही.

याआधी आयसीसीने सहा वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कनकशनचा नियम लागू करण्याची घोषणा केली होती. या नियमाची सुरुवात पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपबरोबर झाली होती. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू फिल ह्यूजचा मृत्यू डोक्याला चेंडू लागल्याने झाला होता. तेव्हापासूनच क्रिकेटमध्ये कनकशन सब्स्टिट्यूट नियम लागू करण्याची मागणी केली जात होती.

क्रिकेटमध्ये मोठे बदल, आता एका चुकीमुळे संपूर्ण संघाला बसणार फटका, 5 धावा कमी होणार

या नियमानुसार एखाद्या खेळाडूच्या डोक्याला किंवा मानेला दुखापत झाल्यावर किंवा चक्कर येणे, स्पष्ट न दिसणे, डोकेदुखी अशी लक्षणे आढळून आली तर त्या खेळाडूच्या जागेवर दुसरा खेळाडू घेतला जातो. खेळाडूंची सुरक्षितता सर्वात महत्वाची असल्याने हा नियम निश्चित करण्यात आला होता. परंतु, प्रभावित झालेली टीम या नियमांतील त्रुटींचा फायदा घेत असल्याचे अनेक वेळा दिसून आले होते. यावर मार्ग काढण्याची मागणी केली जात होती. या मागणीची दखल घेत आयसीसीने नियमांत बदल केले आहेत.

ज्या खेळाडूला कनकशनचा त्रास होत असेल तर त्याच्याऐवजी पर्यायी खेळाडू दिला जातो. यानंतर त्याला पुन्हा मैदानात येण्यासाठी सात दिवस वाट पहावी लागणार आहे. म्हणजेच एखादा खेळाडू दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला तर त्याला पुढील दोन ते तीन दिवसांत होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भाग घेता येणार नाही. याधी असे होत नव्हते. परंतु, नव्या नियमात या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत.

पाच खेळाडूंची नावे सांगावी लागतील

याव्यतिरिक्त आणखी एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे. सामना सुरू होण्याआधी प्लेइंग इलेव्हनबरोबरच पाच खेळाडूंची नावे सांगावी लागतील असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. यात पाच खेळाडू्ंत एक फलंदाज, एक विकेटकीपर, एक स्पिनर, एक ऑलराउंडर आणि एक वेगवान गोलंदाज असणे गरजेचे आहे.

follow us