IND vs AUS Sydney Test : मेलबर्न कसोटी सामना हातचा गमावल्यानंतर आजपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील अखेरचा सामना सुरू झाला आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर हा सामना होत (IND vs AUS Sydney Test) आहे. या सामन्यातही टीम इंडियाची दाणादाण (Team India) उडाली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय संघाच्या चांगलाच अंगलट आला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी लोटांगणच घातलं. पहिल्या डावात भारताचा अख्खा संघ 185 धावांवर बाद झाला.
भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 40 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलँडने भेदक मारा करत चार विकेट्स घेतल्या. या सामन्यात रोहित शर्मा नाही. त्यामुळे संघाची धुरा जसप्रित बुमराहकडे देण्यात आली होती. नाणेफेक जिंकून बुमराहने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मात्र फार यशस्वी ठरला नाही. भारतीय डावाटी सुरुवात चांगली झाली नाही. केएल राहुल नंतर यशस्वी जैस्वालही स्वस्तात बाद झाला. यानंतर जेवणाच्या आधी शेवटच्या चेंडूवर शुभमन गिल देखील तंबूत परतला. दुसऱ्या सेशनमध्ये विराट कोहलीच्या रुपात टीम इंडियाला मोठा धक्का बसला.
मेलबर्नमध्ये दारूण पराभव अन् भारत WTC मधून आऊट? जाणून घ्या नवीन समीकरण
तिसऱ्या सेशनमध्ये तर राहिलेल्या सहा विकेटही पडल्या. ऋषभ पंतने 98 चेंडूत 40 धावा केल्या. तर रवींद्र जडेजाने 26 धावा केल्या. शुभमन गिलने 20 तर विराटने फक्त 17 धावा केल्या. जसप्रित बुमराहने 22 धावा केल्या. कर्णधार म्हणून त्याच्या या सर्वाधिक धावा होत्या. यानंतर भारतीय संघ एकूण 185 धावांवर ऑल आऊट झाला. एकूणच पहिल्या डावात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनकच राहिली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं. स्कॉट बोलँडने भेदक मारा करत चार विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्कने तीन विकेट घेतल्या तर कर्णधार पॅट कमिन्सने 2 आणि नाथन लियोनने एक विकेट घेतली. पहिल्या दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी यावं लागलं. याचं कारण म्हणजे ऑस्ट्रेलियाची ओव्हर गती कमी होती. तीन सेशनमध्ये एकूण 72 ओव्हर टाकल्या गेल्या.
IND vs AUS: रोहित शर्मा घेणार निवृत्ती? मुख्य निवडकर्ता अजित आगरकर मेलबर्नमध्ये दाखल
भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता कोणत्याही परिस्थितीमध्ये सिडनी कसोटी जिंकावी लागणार आहे. याचबरोबर पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाला आणि श्रीलंका (SL vs Aus) मालिकेत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1-0 ने जिंकावी अशी अपेक्षा करावी लागेल. जर बॉर्डर – गावस्कर कसोटी मालिका भारतीय संघाने ड्रॉ केली नाही तर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून बाहेर होणार हे नक्की आहे. त्यामुळे सिडनी कसोटी सामना भारताला कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे.