Rohit Sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना सिडनीत सुरू आहे. या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. या सामन्याही टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण या सामन्यात रोहित शर्मा नाही. खराब कामगिरीमुळे त्याला बाहेर बसवण्यात आलं आहे. यानंतर रोहितचं क्रिकेट करिअर संपल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता खुद्द रोहित शर्मानेच उत्तर देत टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. मी स्वतःच सिडनी कसोटीतून बाहेर बसलो आहे. सध्या माझी बॅट चालत नाही असे रोहित शर्मा म्हणाला.
रोहितच्या करिअरला ब्रेक लावणारे 188 दिवस; सहा महिन्यांत नेमकं काय घडलं?
रोहित म्हणाला, मी स्वतःच सिडनी कसोटीतून बाहेर बसलो आहे. सध्या माझ्या बॅटमधून धावा होत नाहीत. त्यामुळे मी निवडकर्ते आणि प्रशिक्षकाला सांगितलं आहे. पाचव्या कसोटीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मी सुद्धा दोन मुलांचा बाप आहे. कधी काय करायंच हे मला माहिती आहे. हा सामना भारतासाठी महत्वाचा आहे. जे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत त्यांना संधी मिळायला हवी म्हणून मी बाहेर बसण्याचा निर्णय घेतला आहे.
आता जरी माझ्याकडून धावा होत नसल्या तरी पाच महिन्यांनंतरही होणार नाहीत याची शाश्वती नाही. पण माझा हा निर्णय निवृत्तीचा नक्कीच नाही. लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेले लोक ठरवणार नाहीत की मी कधी निवृत्त व्हायचं, असे रोहित शर्माने ठणकावून सांगितलं.
जून 2024 मधील टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहितने टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर त्याने क्रिकेटच्या मैदानातून काही काळ विश्रांती घेतली होती. श्रीलंका दौऱ्याच्या वेळी तो पुन्हा संघात परतला होता. या मालिकेतील तीन सामन्यात रोहितने 52.33 च्या सरासरीने 157 रन केले होते. यानंतर भारतीय संघाचा कसोटी सिझन सुरू झाला. पण प्रत्येक सामन्यात रोहित फ्लॉप ठरला. या काळात रोहितने बांगलादेश विरुद्ध 2, न्यूझीलंड विरुद्ध 3 आणि आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 कसोटी सामने खेळले. पण या दरम्यान त्याला फक्त एकदाच 50 रन करता आले.
Ind vs Aus Test : रोहित शर्मा अन् विराट कोहली निवृत्ती घेणार?, काय म्हणाले रवी शास्त्री?