पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सवर अखेरच्या (T 20) षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत 3 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने स्कॉटलंडचा 35 धावांनी पराभव करत स्पर्धेतील आपली ताकद दाखवून दिली. टी-20 विश्वचषक 2026चा थरार आज 7 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून त्यामध्ये वादळी फॉर्म दिसून आला आहे.
कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत 5 विकेट्स गमावत 182 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तर स्कॉटलंडने झुंजार लढत दिली, मात्र संघाला 147 धावांपर्यंतच मजल मारता आली. 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या 7 धावांवर संघाने मायकेल जोन्स (1) याची विकेट गमावली.
ब्रँडन मॅकमुलेन (14) आणि जॉर्ज मन्सी (19) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र 24 धावांची भागीदारी पाचव्या षटकात तुटली. संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी कर्णधार रिची बेरिंग्टनने खांद्यावर घेतली. त्याने 24 चेंडूमध्ये 42 धावांची आक्रमक खेळी करत सामना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. टॉम ब्रूससोबत चौथ्या विकेटसाठी 78 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही रचली. मात्र बेरिंग्टन बाद होताच स्कॉटलंडचा डाव पुन्हा कोलमडला.
रोमारियो शेफर्डची हॅट्ट्रिक
15व्या षटकात टॉम ब्रूस (35) बाद झाल्यानंतर रोमारियो शेफर्डने कहर केला. 17व्या षटकात त्याने सलग तीन चेंडूवर क्रॉस (11), लीस्क (0), डेव्हिडसन (0) यांना बाद करत शानदार हॅट्ट्रिक साकारली. शेफर्डने 3 षटकांत अवघ्या 20 धावा देत 5 विकेट घेतले. अखेर स्कॉटलंडचा संघ 147 धावांवर आटोपला आणि वेस्ट इंडिजने टी-20 वर्ल्डकप 2026 मधील पहिला विजय दिमाखात नोंदवला.
