Download App

राजकारणाची ‘इनिंग’ सोपी नाहीच! फक्त 5 वर्षांचं पॉलिटिक्स; पहिल्याच निवडणुकीत 7 लाख मते

Gautam Gambhir Retirement from Politics : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची (Lok Sabha Election) पहिली यादी शनिवारी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा (PM Narendra Modi) वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पक्षाने गांधीनगर मतदारसंघातून तिकीट दिले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोटा बुंदी मतदारसंघात नशीब आजमायचे आहे. ही यादी जाहीर होण्याआधीच टीम इंडियाचा माजी कर्णधार गौतम गंभीरने (Gautam Gambhir) आपला निर्णय जाहीर करून टाकला. राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे त्याने सांगितले. गंभीरच्या या निर्णयानंतर तो आता निवडणुकीच्या रिंगणात दिसणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. पण, फक्त पाच वर्षांतच राजकारण सोडण्याचं कारण काय? त्याने हा निर्णय का घेतला? त्याची राजकीय कारकीर्द कशी राहिली? याचा थोडक्यात आढावा घेऊ या.

राजकारणाचा विचार केला तर गौतम गंभीरची राजकीय इनिंग फक्त पाच वर्षांचीच राहिली आहे. 22 मार्च 2019 रोजी त्याने भाजप नेते अरुण जेटली आणि रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने त्याला पूर्व दिल्ली मतदारसंघातून तिकीट दिले. या निवडणुकीत गौतम गंभीरने काँग्रेसचे अरविंद सिंह लवली आणि आप उमेदवार अतीशी मार्लेना यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत त्याला तब्बल 6 लाख 96 हजार 158 मते मिळाली होती.

Gautam Gambhir : ‘राजकीय कर्तव्यातून मुक्त करा’, पहिली यादी येण्यापूर्वीच गौतमची ‘इलेक्शन रिटायरमेंट’

अनाथ मुलांना आर्थिक मदत आणि त्यांचे भविष्य सुधारण्याच्या उद्देशाने गौतम गंभीरने एक स्वयंसेवी संस्था सुरू केली. तसेच सुकमा येथे नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च गंभीर स्वतः करत आहे. याशिवाय जनरसोई योजनेच्या माध्यमातून गरिबांसाठी फक्त एक रुपयात भोजनाची व्यवस्था त्याने उपलब्ध करून दिली. ज्या लोकांकडे अन्न विकत घेण्यासाठी पैसे नाहीत असे गरीब लोक एक रुपयात पोटभर जेवण करू शकतात. गंभीरने आतापर्यंत अशा पाच जनरसोई सुरू केल्या आहेत.

राजकारणा बरोबरच अशी सामाजिक कामे गौतम गंभीर करत असतो. मात्र पाच वर्षांतच त्याचा राजकारणापासून मोहभंग झाला. आता तो पुन्हा क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू इच्छित आहे. त्याला नुकताच कोलकाता संघाच्या मेंटरपदी नियुक्ती मिळाली होती. याआधी त्याने लखनऊ संघाचा मेंटर म्हणून काम पाहिले आहे.

BJP Candidate List : प्रज्ञा ठाकूरांचा पत्ता कट, भोपाळमधून कोणाला मिळाली उमेदवारी?

विश्वचषक विजयात मोठा वाटा 

टीम इंडियाचा यशस्वी खेळाडू म्हणून गौतम गंभीरकडे पाहिले जाते. भारतीय संघाच्या दोन विश्वचषक विजयात त्याचा मोलाचं वाटा आहे. 2007 मधील टी 20 विश्वचषकात त्याने शानदार कामगिरी केली होती. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने 75 धावांची खेळी केली होती. तर 2011 च्या वनडे विश्वचषक स्पर्धेत सुद्धा त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात गौतम गंभीरने कधीही विसरता न येणारी खेळी केली होती. या सामन्यात त्याने 97 धावा केल्या होत्या. कर्णधार महेंद्रसिंह धोनी बरोबर त्याने महत्वाची भागीदारी केली होती. हा सामना जिंकून भारत विश्वविजेता बनला होता.

गंभीरची क्रिकेट कारकिर्द 

गौतम गंभीरने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत 58 कसोटी, 147 वनडे आणि 37 टी 20 सामने खेळले. कसोटीत त्याने 41.96 च्या सरासरीने 4 हजार 154 धावा केल्या. ज्यामध्ये 9 शतक आणि 22 अर्ध शतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 5 हजार 238 धावा केल्या आहेत. यामध्ये 11 शतक आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडेत त्याची सर्वोच्च धावसंख्या 150 अशी आहे. टी 20 सामन्यात सात अर्धशतकांच्या मदतीने गौतम गंभीरने 932 रन केले आहेत.

follow us