वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतर भारताला आणखी एक धक्का बसला आहे. आयसीसीने स्लो ओव्हर रेटसाठी टीम इंडियाला संपूर्ण मॅच फी चा दंड ठोठावला आहे. भारतासोबतच ऑस्ट्रेलियालाही दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीने ट्विट करून याबाबत माहिती दिली. लंडनमधील ओव्हल मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारताला 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात टीम इंडियाची बॅटिंग लाईन अप फ्लॉप ठरली. ( ind-vs-aus-final-team-india-fined-entirety-of-wtc-2023-final-match-fees-for-slow-over-rate-london)
फायनलमध्ये स्लो ओव्हर रेटसाठी भारताला संपूर्ण मॅच फी चा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला मॅच फीच्या 80 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. टीम इंडिया वेळेपेक्षा 5 षटके मागे होती. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन संघ वेळेपेक्षा 4 षटके मागे होता. टीम इंडियाच्या खेळाडूंनाही याचा फटका बसला आहे. आयसीसीने शुभमन गिलला दंडही ठोठावला आहे. त्याला मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
‘त्याने एकट्यानेच वर्ल्ड कप जिंकला’; धोनीच्या विषयावरुन हरभजन संतापला
विशेष म्हणजे अंतिम फेरीत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या. यानंतर संघाने 270 धावा करून दुसरा डाव घोषित केला होता. टीम इंडियाने पहिल्या डावात 296 धावा आणि दुसऱ्या डावात 234 धावा केल्या. अशाप्रकारे टीम इंडियाला 209 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्याच्या दुसऱ्या डावात शुभमन गिलचे बाद होणे वादग्रस्त ठरले. त्याच्या पकडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
भारताचा सलामीवीर गिल अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात केवळ 13 धावा करून बाद झाला. रोहित 15 धावा करून आणि पुजारा 14 धावा करून बाद झाला. कोहलीही 14 धावा करून बाद झाला. श्रीकर भरतने 31 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात गिल 18 धावा करून बाद झाला. पुजारा 27 धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाला खातेही उघडता आले नाही. टीम इंडियाच्या पराभवासाठी खराब फलंदाजी कारणीभूत ठरली.