Champions Trophy Final IND vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनल सामना आज दुपारपासून (Champions Trophy 2025) सुरू होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या सामन्यात (IND vs NZ) आमनेसामने असतील. हा सामना दुबईत होणार असून क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्यात भारतासमोर न्यूझीलंडचे कडवे आव्हान असणार आहे. याच स्पर्धेतील साखळी सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला होता. याआधी सन 2000 मध्ये दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीत भिडले होते. त्यावेळी मात्र न्यूझीलंडने भारताचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली होती. आता पुन्हा 25 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात भारत न्यूझीलंड भिडणार आहेत. या सामन्यात टीम इंडिया 25 वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा वचपा काढणार का याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
15 ऑक्टोबर 2000 या दिवशी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना होता. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने होते. नैरोबीत हा सामना झाला होता. या सामन्यात सौरभ गांगुलीने 119 तर सचिन तेंडुलकरने 69 धावा केल्या होत्या. बाकीच्या फलंदाजांना फार काही करता आले नाही. त्यामुळे भारताला कशाबशा 264 धावा करता आल्या. जिंकण्यासाठी न्यूझीलंडला 265 धावा करायच्या होत्या.
या सामन्यात गोलंदाजांचा दबदबा राहिला. क्रेग स्पिअरमनला फक्त 2 धावांवर आणि कर्णधार स्टीफन फ्लेमिंगला फक्त पाच धावांवर व्यंकटेश प्रसादने तंबूत धाडले. भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे 132 धावांवरच न्यूझीलंडचे पाच प्रमुख फलंदाज बाद झाले होते. यानंतर अष्टपैलू क्रिस केर्न्स आणि क्रिस हॅरिस या दोघांनी डाव सावरला. तब्बल 148 धावांची भागीदारी करत भारताला पराभूत केले. दोघे खेळपट्टीवर स्थिरावले ही जोडी फोडण्यात बराच वेळ भारतीय गोलंदाजांना यश मिळाले नाही. हॅरिसने नाबाद 102 तर केर्न्सने 46 धावा केल्या.
फायनलनंतर सामन्यानंतर रोहित शर्मा खरंच निवृत्ती घेणार का? शुभमन गिलने दिली आतली माहिती
भारताने हा सामना गमावला होता. पण आज 25 वर्षांनंतर पुन्हा तीच स्थिती निर्माण झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने आहेत. त्यामुळे 25 वर्षांपूर्वीच्या या पराभवाचा वचपा काढण्याची नामी संधी रोहित ब्रिगेडकडे आहे. या सामन्यात दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. त्यामुळे हा सामना चुरशीचा होईल अशी शक्यता दिसत आहे.
2019 मधील वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने पुन्हा टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला होता. उपांत्य फेरीतील या सामन्यात न्यूझीलंडने फक्त 239 धावा केल्या होत्या. सामना जिंकण्याची संधी भारताला होती. पण असं घडलं नाही. या सामन्यात फलंदाजांनी हाराकिरी केली. 71 धावांतच पाच फलंदाज बाद झाले होते. रवींद्र जडेजाने 77 आणि एमएस धोनीने 50 धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे दोघेही टीमला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. पुढे धोनीला मार्टिन गुप्टीलने रन आऊट केले आणि टीम इंडियाच्या विजयाच्या आशा मावळल्या. या सामन्यात न्यूझीलंडने फक्त 18 धावांनी भारतीय संघाचा पराभव केला होता.