IND VS AUS: वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारताने विजयी सलामी दिली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटने पराभव केला आहे. एकवेळ भारताचे अव्वल तिन्ही फलंदाजही शुन्यावर बाद झाले होते. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने झुंजार खेळी केली. दोघांनी आपले अर्धशतके झळकविले. या दोघांच्या जोरावर भारताने दोनशे धावांचे लक्ष्य पूर्ण केले. केएल राहुलने नाबाद 97 धावा केल्या. तर विराटने 85 धावांची खेळी केली. या जोरावर भारताने 42 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सामना जिंकला. राहुलने पॅट कमिन्सच्या चेंडूवर षटकार मारत सामना जिंकून दिला आहे. (India defeated Australia by six wickets in the first match of the World Cup)
सलामीवीर इशान किशन, रोहित शर्मा हे दोघे शुन्यावर बाद झाले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला आलेला श्रेयस अय्यरही शुन्यावर बाद झाला. दोन धावांवर भारताचे तिन्ही फलंदाज बाद झाले होते. त्या दोन धावाही अतिरिक्त होत्या. त्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहलीने 165 धावांची भागीदारी केली. कोहली बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या व राहुलने भारताला 42 व्या षटकात सामना जिंकून दिला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताने 199 धावांवर ऑलआउट केले आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 46 धावा केल्या. त्याने 71 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार मारले. डेव्हिड वॉर्नरने 52 चेंडूत 41 धावा केल्या. वॉर्नरने 6 चौकार मारले. लॅबुशेनने 27 आणि मॅक्सवेलने 15 धावांचे योगदान दिले. पॅट कमिन्स 15 धावा करून बाद झाला.
या सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी चमकदार कामगिरी केली आहे. रवींद्र जडेजाने 10 षटकांत 28 धावा देत 3 बळी घेतले. कुलदीप यादवने 10 षटकांत 42 धावा देत 2 बळी घेतले. रविचंद्रन अश्विनला एक विकेट मिळाली. वेगवान गोलंदाज बुमराहने 2 बळी घेतले. हार्दिक पांड्या आणि मोहम्मद सिराजला प्रत्येकी एक विकेट मिळाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही. झंझावाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला मिचेल मार्श खातेही न उघडता बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला विराट कोहलीने झेलबाद केले.
यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरने दमदार सुरुवात केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. मात्र, चेंडू जुना झाल्यानंतर दोघांनाही धावा काढणे कठीण झाले. वॉर्नर 52 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 41 धावा करून बाद झाला. तो त्याच्याच चेंडूवर कुलदीप यादवने झेलबाद झाला. यानंतर मार्नेल लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात 36 धावांची भागीदारी झाली, पण स्मिथ बाद होताच ‘तू चल मैं आया’च्या धर्तीवर ऑस्ट्रेलियन फलंदाज बाद झाला.