WI vs IND 1st Test : गोलदाजांनंतर फलंदाजांनी चोख कामगिरी बजावल्याने दुसऱ्याच दिवशी भारताने कसोटीवर (Team India) पकड मजबूत केली आहे. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा टीम इंडिया 2 बाद 312 धावांवर खेळत होती. सध्या टीम इंडियाकडे एकूण 162 धावांची आघाडी आहे.
यशस्वीचा वेस्ट इंडिजमध्ये पराक्रम !
पहिल्या दिवशी वेस्टइंडिजचा डाव अवघ्या 150 धावांत गुंडाळल्यानंतर पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाने बिनबाद 80 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी देखील रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) सावध पवित्रा घेत खेळ केला. विशेष बाब म्हणजे टीम इंडियाच्या दोन्ही सलामीवीरांनी शतके झळकावली. रोहित 221 चेंडूत 103 धावा काढून बाद झाला. मात्र दुसरा सलामीवीर यशस्वी अजूनही मैदानात तग धरुन आहे. त्याने पदार्पणातच विक्रमी खेळी केली. तो सध्या 143 धावांवर (Yashasvi Jaiswal century) खेळत आहे.
रोहित शर्मानंतर फलंदाजीला आलेल्या शुभमन गिलला छाप सोडता आली नाही. तो 11 चेंडूत 6 धावा काढून परतला. मात्र त्यानंतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने यशस्वीला चांगली साथ दिली. दोघांनी 72 धावांची भागिदारी करत टीम इंडियाला सुस्थितीत नेले. दुसऱ्या दिवसअखेर विराट 36 धावांवर खेळत होता. विराटने कसोटीमध्ये 8 हजार 508* धावांचा टप्पा ओलांडून वीरेंद्र सेहवागला (8,503) मागे टाकले आहे.
वेस्टइंडिजकडून गोलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी त्यांच्या गोलंदाजी सहज खेळून काढली. जोमेल वॉरिकन आणि एलिक अथांजे दोघांनी प्रत्येकी एक-एक गडी टीपला. विशेष बाब म्हणजे वेस्टइंडिजने 9 गोलंदाजांचा वापर करुनही काही फरक पडला नाही.
सामन्याचे तीन दिवस बाकी असल्याने टीम इंडियाकडे मोठी आघाडी होण्याची संधी चालून आली आहे. यशस्वी आणि विराटची जोडी टीम इंडियाला किती धावांची आघाडी मिळवून देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.