टीम इंडियाची ऐतिहासिक नामुष्की! न्यूझीलंडने 244 धावांनी उडवला धुव्वा, पहिल्याच षटकात सामन्याचं चित्र पालटलं

India vs New Zealand 4th ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वनडेत भारताची फलंदाजी अक्षरशः कोलमडली. टीम इंडियाचा जलवा.

News Photo   2026 11 13T182126.500

India vs New Zealand 4th ODI

India vs New Zealand 4th ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात (India) भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. माऊंट मोनगानुई येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा तब्बल 244 धावांनी धुव्वा उडवला. विशेष म्हणजे, वनडे क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. 334 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संपूर्ण भारतीय संघ अवघ्या 89 धावांवर गारद झाला. भारतीय फलंदाजांची ही कामगिरी चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरली. या पराभवामागे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री याची भेदक गोलंदाजी निर्णायक ठरली.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 333 धावांची मोठी मजल मारली होती. त्यामुळे भारतीय फलंदाजांकडून आक्रमक सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र, डावाच्या पहिल्याच षटकात मॅट हेन्रीने भारताला असे धक्के दिले की संपूर्ण सामन्याचे चित्रच बदलले. पहिल्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला, तर पाचव्या चेंडूवर विराट कोहलीला क्लीन बोल्ड करून हेन्रीने भारताला दुसरा धक्का दिला. एकाच षटकात दोन प्रमुख फलंदाज माघारी परतल्याने भारतीय संघ बॅकफूटवर गेला.

हेन्रीचा मारा एवढ्यावरच थांबला नाही. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने श्रेयस अय्यरला पायचीत पकडत तिसरा बळी मिळवला. विशेष म्हणजे रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या तिघांनाही खाते उघडता आले नाही. पहिल्याच षटकानंतर भारताची धावसंख्या 0 असताना तीन महत्त्वाचे फलंदाज तंबूत परतले होते. अशा सुरुवातीमुळे भारतीय संघावर प्रचंड दबाव निर्माण झाला आणि विजयाच्या आशा सुरुवातीलाच धूसर झाल्या.

Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

अवघ्या 9 धावा फलकावर लागल्या असताना भारताने चौथी विकेट गमावली. ऋतुराज गायकवाडकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र त्यालाही केवळ 5 धावा करता आल्या. त्यानंतर इशान किशन आणि अक्षर पटेल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी काही काळ मैदानावर तग धरला. अक्षरने 36 चेंडूंत 21 धावा केल्या, तर इशानने 53 चेंडूंचा सामना करत 27 धावा जमवल्या. मात्र, मॅथ्यू फिशरने अक्षरला बाद करून ही भागीदारी मोडली आणि त्यानंतर इशानही माघारी परतला. भारताची अवस्था 61 धावांत 6 बाद अशी झाली.

यानंतर भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. नमन धीरने 24 चेंडूंत 21 धावा करत थोडाफार प्रतिकार केला. मात्र, फिशरने त्यालाही बाद केले. गुरनूर बरारला केवळ 2 धावा करता आल्या, तर अकीब नबी आणि कुलदीप यादव यांनाही फार काळ मैदानावर टिकता आले नाही. अखेर भारताचा संपूर्ण डाव 89 धावांवर संपुष्टात आला आणि न्यूझीलंडने मोठा विजय नोंदवला.

न्यूझीलंडच्या विजयाचा खरा शिल्पकार मॅट हेन्री ठरला. त्याने 9.4 षटकांत अवघ्या 27 धावा देत 6 भारतीय फलंदाजांना माघारी धाडले. त्याला मॅथ्यू फिशरने उत्तम साथ देत 3 बळी मिळवले. या दोघांच्या भेदक गोलंदाजीमुळे भारतीय फलंदाजीची दाणादाण उडाली. 334 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला शंभरीही गाठता आली नाही. त्यामुळे 244 धावांनी झालेला हा पराभव भारतीय वनडे क्रिकेटच्या इतिहासातील अत्यंत निराशाजनक पराभवांपैकी एक ठरला.

Exit mobile version