सलग 10 सामने जिंकून फायनलमध्ये धडक मारलेल्या टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS) सहा विकेटने पराभव केला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघाचे आणि प्रत्येक प्लेअर तोंडभरुन कौतुक होत आहे. पण त्याचवेळी ऑस्ट्रेलियन मीडियाने मात्र खिलाडू वृत्तीला तिलांजली दिल्याचे म्हणत भारतीय खेळाडू आणि प्रेक्षकांना खलनायक ठरविले आहे. पॅट कमिन्सला जेव्हा ट्रॉफी प्रदान केली तेव्हा 1 लाख 30 हजारांहून अधिक क्षमतेचे संपूर्ण स्टेडियम रिकामे होते, शिवाय भारतीय (India) खेळाडूही ऑस्ट्रेलियाच्या विजयात सहभागी झाले नाहीत, असे म्हणत टीका केली आहे.
‘द क्रॉनिकल’ने भारतावरील विजयानंतर भारतीय खेळाडू आणि प्रेक्षकांनी खिलाडूवृत्ती न दाखवल्याची टीका केली आहे. ‘द क्रॉनिकल’ने म्हटले की, ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप ट्रॉफी दिली जात असताना भारतीय खेळाडूंची वागणूक नक्कीच चांगली नव्हती. हे त्यांच्यासाठी दुःख मोठे होते. कारण भारत स्पर्धेत एकही मॅच हारला नव्हता. अशातच ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून विजय मिळवून 140 कोटी भारतीयांची मने तोडली. मॅचनंतर ऑस्ट्रेलियन संघ वर्ल्डकप ट्रॉफीसह आनंद साजरा करत होता. त्यावेळी भारतीय खेळाडूंनी खिलाडूवृत्ती न दाखवता त्या ट्रॉफी सोहळ्याकडे दुर्लक्ष केले.
ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने पुढे लिहिले की, “टूर्नामेंटच्या सुरुवातीच्या दोन पराभवानंतरही आयसीसी क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा करणे ही कोणत्याही ऑस्ट्रेलियन संघासाठी एक विलक्षण कामगिरी होती. पण पॅट कमिन्स आणि त्याच्या संघाला हे यश तेवढे मोठे जाणवले नसावे. कारण 1 लाख 30 हजारांहून अधिक क्षमतेच्या स्टेडियममध्ये जेव्हा ट्रॉफी सुपूर्द करण्यात आली तेव्हा संपूर्ण स्टेडियम रिकामे होते.सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा ही ट्रॉफी ऑस्ट्रेलियन संघाकडे सुपूर्द करण्यात आली तेव्हा भारतीय संघ सुद्धा दिसत नव्हता.
‘हेराल्ड सन’ने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा हवाला देत लिहिले की, भारताने तयार केलेली खेळपट्टी भारतावरच उलटली. पाँटिंगने अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत भारताच्या रणनीतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. रिकी पॉन्टिंग म्हणाला की, ही खेळपट्टी भारतीय उपखंडातील परिस्थिती लक्षात घेऊन तयार केलेली खेळपट्टी होती. पण ही खेळपट्टी भारतावरच उलटली. अंतिम सामन्याची खेळपट्टी तीच होती ज्यावर भारताने गेल्या महिन्यात साखळी सामन्यात पाकिस्तानवर सात गडी राखून विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनेही सामन्याच्या एक दिवस आधी विकेटबाबत चिंता व्यक्त केली होती.
द टेलिग्राफने म्हटले की, अनेक दशकांपासून सुरू असलेली निराशा अजूनही कायम आहे. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेलेला अंतिम सामना पाहण्यासाठी आलेले लाखो प्रेक्षकच शांत राहिले नाहीत, तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी 140 कोटी भारतीयांना गप्प केले आणि विश्वचषक जिंकला, अशीही टीका टेलिग्राफने केली.