टीम इंडियासाठी सेमीफायनलचं ‘मिशन इम्पॉसिबल’? पाहा काय सांगतंय आकड्यांचं गणित

प्रत्येक सामना आता भारतासाठी अक्षरशः 'क्वार्टर फायनल' बनला आहे. झिम्बाब्वेविरुद्धचा सामना ही रनरेट सुधारण्याची सुवर्णसंधी आहे.

  • Written By: Published:
T 20 World

वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा अक्षरशः धुव्वा उडवल्यानंतर टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सेमीफायनलचं समीकरण भारतासाठी भयंकर गुंतागुंतीचं झालंय. (T 20) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मानहानीकारक पराभवानंतर टीम इंडिया सध्या सुपर-8 च्या ग्रुपमध्ये थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलाय. भारताचा नेट रनरेट इतका रसातळाला गेलाय की, आता केवळ ‘विजय’ मिळवून भागणार नाही, तर प्रतिस्पर्ध्याला मोठ्या फरकाने चिरडून टाकावं लागेल. थोडक्यात सांगायचं तर, भारताकडे आता चुकांना बिलकुल जागा नाही; एक चूक आणि वर्ल्ड कपचं स्वप्न भंगणार, अशी ‘करो या मरो’ची स्थिती निर्माण झालीय.

सध्या टीम इंडियासमोर सर्वात मोठा राक्षस उभा आहे तो म्हणजे मायनस नेट रनरेटचा (-3.800). दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या धक्क्यामुळे भारत पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या नंबरवर फेकला गेला असून, वेस्ट इंडिजचा रनरेट (+5.350) गगनाला भिडला आहे. अशा स्थितीत भारताला पुढचे दोन्ही सामने म्हणजे झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध केवळ जिंकायचे नाहीत, तर ते ‘विशाल’ फरकाने जिंकावे लागतील. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताला धावांचा डोंगर उभा करून त्यांचा मोठा पराभव करावा लागेल, तरच वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात भारताला काही संधी उरेल.

वेस्ट इंडिजने दिला भारताला धक्का; आता सेमीफायनल अवघड ? जाणून घ्या समीकरण

सेमीफायनलच्या शर्यतीत आता दक्षिण आफ्रिकेच्या निकालावरही भारताचं भवितव्य अवलंबून आहे. जर दक्षिण आफ्रिकेने आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकले, तर भारताला 4 गुणांसह पुढे जाण्याची संधी मिळेल. मात्र, जर वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला हरवलं, तर भारत, विंडीज आणि आफ्रिका या तिन्ही संघांमध्ये गुणांची बरोबरी होईल. अशा ‘थ्री-वे टाय’च्या स्थितीत ज्याचा रनरेट सरस असेल, तोच सेमीफायनलमध्ये धडक मारणार! दुर्दैवाने भारत सध्या या शर्यतीत सर्वात मागे आहे, त्यामुळे भारताला नशिबासोबतच स्वतःच्या खेळाचा दर्जाही कित्येक पटीने वाढवावा लागेल.

येणारा प्रत्येक सामना आता भारतासाठी अक्षरशः ‘क्वार्टर फायनल’ बनला आहे. झिम्बाब्वेविरुद्धचा सामना ही रनरेट सुधारण्याची सुवर्णसंधी आहे, तर वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना हा अस्तित्वाची लढाई असेल. जर भारताने एक जरी सामना गमावला, तर 2026 च्या वर्ल्ड कपचा प्रवास सुपर-8 मध्येच संपुष्टात येईल. त्यामुळे टीम इंडियाला मैदानात उतरून केवळ खेळायचं नाही, तर समोरच्या संघाचा मोठ्या फरकाने धूळ चारायची आहे. भारताचा सेमीफायनलचा रस्ता आता काट्याकुट्यांचा झालाय, पण ‘विशाल विजय’ मिळवून तो रस्ता मोकळा करण्याची ताकद फक्त भारतीय खेळाडूंमध्येच आहे.

follow us