दूध भेसळीच्या रॅकेटमुळे वळसे पाटील बॅकफूटवर गेलेत का ?
Dilip Walse Patil : वळसे पाटील हे बॅकफूटवर गेलेत का ? वळसे पाटलांवर काय आरोप होतातय ? वळसे पाटलांनी हे आरोप कसे फोटाळून लावत विरोधकांना सुनावले आहे,
Dilip Walse Patil VS Devdatta Nikam: राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Munde) यांनी भेसळखोरांविरुद्ध आसूड उगारलाय. त्यातून दूध भेसळीतील ‘बोके’ राज्यभरात सापडतायत. एफडीएची दूध भेसळीवर दररोज कुठेना-कुठे कारवाई होतेय. त्यात पुणे जिल्ह्यातील मंचरमधील सर्वात मोठे दूध भेसळीचे रॅकेट पोलिस आणि एफडीएने उघडकीस आणले. येथून दूध भेसळीसाठी साहित्य पाठवून बनावट दूध बनविले जात होते. दूध भेसळीचे कोट्यवधींचे साहित्य जप्त झाल्यानंतर पुणे, सोलापूर, जळगाव, अहिल्यानगरमधील तेरा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या रॅकेटमध्ये दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आढळले आणि विरोधकांनी थेट माजी मंत्री, ज्येष्ठ नेते व आमदार दिलीप वळसे पाटलांकडे (Dilip Walse Patil) बोट केले आहे. त्यांच्याविरोधात मोहिम उघडण्यात आली. त्यामुळे वळसे पाटील हे बॅकफूटवर गेलेत का ? वळसे पाटलांवर काय आरोप होतातय ? वळसे पाटलांनी हे आरोप कसे फोटाळून लावत विरोधकांना सुनावले आहे, हे आपण जाणून घेऊया…
उगवण झाली नाही अन् दुबार पेरणीतही निघालं सडलेलं बियाणं; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
कोणामुळे वळसे पाटलांवर आरोपांची राळ उठलीय ?
मंचरमध्ये दूध भेसळीचे राज्यातील मोठे रॅकेट उघडकीस आले. बनावट दूधासाठी साहित्य पुरविणारा संदीप कांतीलाल लोढा, सुशांत हिंगे असे दोन बडे मासे पोलिस आणि एफडीएच्या हाती लागली. त्यात सुशांत हिंगे हा कात्रज दूध संघाचे माजी अध्यक्ष व संचालक विष्णूकाका हिंगे यांचा पुतण्या आहे. विष्णूकाका हिंगे हे वळसे पाटलांचे जवळचे स्थानिक नेते आहेत. वळसे यांना घेरण्यासाठी स्थानिक मुद्दा विरोधकांकडे नव्हता. परंतु दूध भेसळीचा मुद्दा सापडल्यानंतर विरोधकांना वळसेंविरोधात आयते कोलित मिळाले. त्यातून दूध भेसळीविरोधात विरोधकांनी वळसेंविरोधात मंचरमध्ये आंदोलन सुरू केली. वळसेंना घेरण्यासाठी सोशल मीडियाचा जोरदार वापर सुरू झाला.
देवदत्त निकमांबरोबर भाजपचे नेते वळसेंविरोधात आक्रमक
देवदत्त निकम हे एकेकाळी वळसे यांचे जुने साथीदार होते. परंतु विधानसभेच्या निवडणुकीत ते विरोधात गेले. शरद पवारांनी देवदत्त निकम यांना थेट आंबेगाव मतदारसंघातून वळसेंच्याविरोधात उमेदवारी दिली. त्यात देवदत्त निकमांनी सात टर्म येथून विजयी झालेले व मंत्री राहिलेले दिलीप वळसे पाटलांना घाम फोडला होता. अटीतटीच्या लढतीत वळसे पाटील हे अवघ्या 1600 मतांनी विजयी झाले. मोठ्या मताधिक्याने विजयी होणारे वळसे यांचे मताधिक्य प्रचंड घटले. त्यामुळे तेव्हा ते कार्यकर्त्यांवर नाराज झाले होते. विधानसभेपासून देवदत्त निकम हे वळसेंना अडचणीत आणण्यासाठी कोणतीही संधी सोडत नाहीत. त्यामुळे त्यांनी दूध भेसळीचा मुद्दा पुढे करून वळसेंना घेरले आहे. त्यांच्याविरोधात एल्गार मोर्चा काढून थेट आमदारकीचा राजीनामा देण्याची मागणी निकम यांनी केलीय. बरं निकमच वळसेंविरोधात मैदानात उतरले नाहीत. सत्ताधारी भाजपचे नेते स्थानिक नेते जयसिंग एरंडे, ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देविदास दरेकर, राजाराम बाणखेले हे स्थानिक नेत्यांनीही वळसेंविरोधात आघाडी उभी केलीय. दूध भेसळीविरुद्ध वळसे विधानसभेत का बोलते नाही. दूध भेसळीचे आका कोण आहेत, असा आरोप विरोधकांनी केले आहेत.
वळसेंनी थेट विरोधकांना ललकारले, जुने प्रकरणे काढले
चोहोबाजूने घेरल्यानंतर रविवारी वळसे पाटील यांनी मंचरमध्ये कार्यकर्त्यांचा संवाद आयोजित केला होता. बनावट दूध केवळ मंचरमध्ये पकडले गेले आहेत का ? राज्यात सर्वत्र कारवाई होत आहे. राष्ट्रवादी कार्यकर्ते अडकले आहेत. भाजपचे कार्यकर्त्यांचा दूध भेसळीवर कारवाई होते. त्याविरोधात कोणीही ब्र शब्द काढत नाही. मला दूध भेसळीचा आका म्हणेपर्यंत त्यांची हिम्मत गेलीय. माझ्याविरोधात कटकारस्थान रचले जात आहे असल्याचा दावाही वळसे यांनी आपल्या भाषणात केला. माझा जवळचा कार्यकर्ता दूध भेसळीत असला तरी त्यांना पाठीशी घालणार नाही. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई व्हावी, ही माझी भूमिका असल्याचे वळसे यांनी जाहीरपणे सांगितले. वळसे यांनी देवदत्त निकम यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मी दूध भेसळीचा पडद्याआडचा सूत्रधार नाही. पण आपल्या तालुक्यातील आका कोण आहे हे तालुक्याला माहिती आहे, असे प्रत्युत्तर वळसे यांनी दिले आहेत. तुमच्या गावात पतसंस्था होती. कुठे गेली, तिचे काय झाले. श्रीक्षेत्र थापलिंग देवस्थान ट्रस्टमध्ये काही चालू आहे, असे सवाल करत वळसे यांनी देवदत्त निकम यांना घेरले आहे. देवदत्त निकम हे थापलिंग देवस्थानचे ट्रस्ट्री आहेत. विरोधक करत असलेल्या आरोपाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सडेतोड उत्तर द्यावी, असा सूचनाही वळसे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. एकंदरित विरोधकांनी वळसेंविरोधात जोरदार मोहिम उघडली आहेत. त्यात बॅकफूटला गेलेले वळसे पाटील हे भविष्यात त्यांना कसे उत्तर देतात हे महत्त्वाचे आहे.