India vs Bangladesh : एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) 2023 चा 17 वा सामना आज भारत आणि बांगलादेश यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने दिलेले 257 धावांचे आव्हान टीम इंडियाने सहज पार केले. टीम इंडियाने बांगलादेशवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे.
टीम इंडियाने 257 धावांचे लक्ष्य 41.3 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले. विश्वचषकात भारताचा हा सलग चौथा विजय आहे. बांगलादेशने दिलेले 257 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी टीम इंडियाचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात दिली. रोहित शर्माने 48 आणि शुभमन गिलने 53 धावा केल्या.
यानंतर आलेल्या विराट कोहलीने 103 धावांच्या नाबाद शतकाने भारतीय संघाला सलग चौथा विजय मिळवून दिला. विराटने 97 चेंडूत 103 धावा केल्या. या शतकात 6 चौकार तर 4 षटकारांचा समावेश आहे. कोहलीने वनडे क्रिकेटमधील 48 वे शतक झळकावले. तो सचिन तेंडूलकराच्या सर्वाधिक 49 शतकांच्या रेकॉर्डपासून केवळ एक शतक दूर आहे.
निलेश लंकेंच्या मनात तरी काय? अजितदादांबरोबर जंगी सभा, आता जयंत पाटलांची थेट ‘ऑफर’
तर केएल राहुलने 34 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह 34 धावा केल्या. कोहली आणि राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 83 धावांची नाबाद भागीदारी केली.
प्रथम फलंदाजी करताना लिटन दासच्या अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशने 50 षटकांत 8 गडी गमावून 256 धावा केल्या. बांगलादेशच्या तन्झीद हसन आणि लिटन दास यांनी पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. तन्झीद खान 51 धावा करून बाद झाला. लिटने 82 चेंडूत 66 धावा केल्या. महमुदुल्लाहने 46 धावांचे योगदान दिले. भारताकडून मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाने 2-2 बळी घेतले.
हार्दिक पांड्या जखमी
सामन्याच्या 9व्या षटकात भारतीय संघासाठी चिंताजनक घटना घडली. फलंदाजाने मारलेला फटका अडवतांना हार्दिकच्या पायाला मोच आली. त्यामुळे हार्दिकला नीट चालताही येत नव्हते. त्याने त्याही परिस्थितीत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला पण तो करू शकला नाही. अखेर त्याला मैदानाबाहेर काढण्यात आले. जेव्हा हार्दीक पांड्या मैदानाबाहेर गेला, तेव्हा त्याचे 3 चेंडू शिल्लक होते. अखेर त्याचे षटक संपवण्यासाठी विराट कोहलीला बोलावण्यात आलं.