मुंबई : भारतीय (India ) संघाने तिसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा ( New Zealand) 168 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली. तिसऱ्या टी-20 सामन्यात युवा स्टार फलंदाज शुभमन गिलने अप्रतिम खेळ दाखवताना तुफानी शतक ठोकले. त्याच्यामुळेच टीम इंडियाला विजयाची नोंद करण्यात यश आले.
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात शुभमन गिलने 63 चेंडूत 126 धावा केल्या, ज्यात 12 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. त्याच्यामुळेच टीम इंडियाला 234 धावांचा डोंगर उभा करता आला. दरम्यान गिलने शतक झळकावताच अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर नोंदवले आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजाला मागे टाकले.
तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा शुभमन गिल हा भारताचा पाचवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळले आहेत. गिलने बांगलादेशविरुद्ध कसोटी शतक, श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय शतक आणि न्यूझीलंडविरुद्ध टी-20 शतक झळकावले आहे.
तत्पूर्वी, भारताने न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात 20 षटकात 4 बाद 234 धावा केल्या. त्याचबरोबर न्यूझीलंड संघाला विजयासाठी 235 धावांचे लक्ष्ये देण्यात आले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव 12.1 षटकांत 66 धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघाने 2-1अशा फरकाने मालिका आपल्या नावावर केली.
भारतीय संघाने उत्तम गोलंदाजी या सामन्यात केली. टीम इंडियाकडून गोलंदाजी करताना कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावी या वेगवान गोलंदाजी त्रिकुटाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.